esakal | गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून स्टार्टअप, आज भारतातील अग्रगण्य EDU TECH कंपनी
sakal

बोलून बातमी शोधा

BYJU'S}

गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून स्टार्टअप, आज भारतातील अग्रगण्य EDU TECH कंपनी

sakal_logo
By
सुमित बागुल

आपण सर्वांनी थ्री इडियट्स हा सिनेमा पहिला असेलच. त्यातील आमिर खान याचं एक वाक्य सर्वांना कायम प्रेरणा देतं. या सिनेमात आमिर खान सर्वांना एकच गोष्ट वारंवार सांगत असतो ती म्हणजे "Excellence का पीछा करो कामयाबी झक मार के आएगी". म्हणजेच मेहनतीने, जिद्दीने तुम्ही कोणतही काम, गोष्ट शिकून घेतलीत तर त्याचं चांगलं फळ तुम्हाला कधीना कधी नक्कीच मिळतं.

हा लेख देखील अशाच एका व्यक्तीचा आहे ज्यांनी स्वतःच्या मेहनतीच्या आणि जिद्दीच्या जोरावर प्रचंड स्पर्धा प्रचंड आणि अपुऱ्या संसाधनात देखील केवळ स्वतःच्या कल्पनेच्या जोरावर एक स्टार्टअप सुरु केला. आज भारतात आणि जगभरात हाच स्टार्टअप एक मोठी कंपनी बनलेली आपण पाहतोय. या मल्टिनॅशनल कंपनीची सध्याची किंमत काही हजार कोटींमध्ये आहे. या कंपनीच्या माध्यमातून आपल्या भविष्यावर प्रचंड परिणाम होणार तर आहेच, सोबत जुन्या शिक्षणाच्या व्याख्या बदलणारा हा स्टार्टअप ठरतोय.

या कंपनीचं नाव आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे. या स्टार्टअपचं नाव आहे 'बायजू'. या लेखाच्या माध्यमातून बायजू याना नक्की शिक्षण क्षेत्रात काहीतरी अमूलाग्र बदल घडवण्याची संकल्पना आली कुठून, त्यामागे त्यांनी किती मेहनत घेतली गेली या सर्व गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत.

२०११ मध्ये झाली कंपनीची सुरवात

बायजू'स च्या जाहिराती टीव्हीवर, वर्तमानपत्रात किंवा सोशल मीडियावरील जाहिरातींमधून कायम आपल्या समोर येत असतात. ही बायजू कंपनी दक्षिण भारतातील बंगलोरमधील एक कमोदिनी आहे जी शिक्षण क्षेत्रातील तंत्रज्ञान आणि ऑनलाईन शिक्षणावर काम करते. २०११ मध्ये या कंपनीची सुरवात झाली. अर्थात त्यावेळी अगदी काही जणांनाच या कंपनीबाबत माहिती होती. मात्र आता ही जगभरातील एज्युटेक म्हणजेच शिक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी म्हणून ओळखली जाते.

"माझं शिक्षण मल्याळम माध्यमाच्या शाळेत झालं, आणि मी क्रिकेटची कॉमेंट्री ऐकून इंग्रजी शिकलो" - बायजू रवींद्रन

शिकवण्याचं बाळकडू मिळालं आई बाबांकडून

या कंपनीची सुरवात एका ध्येयवेड्या माणसाने केली ज्यांचं नाव आहे बायजू रवींद्रन. कंपनी सुरु एका माणसापासून झाली मात्र सध्या या कंपनीत हजारो लोकं काम करतायत. बायजू या कंपनीची कहाणी सुरु झाली कान्नूरच्या अझिकोडेमधून. बायजू रवींद्रन यांचा जन्म एका मोठ्या संयुक्त कुटुंबात झाला. त्यांचं आईच नाव शोभना आणि वडिलांचं नाव रवींद्रन. हे दोघे पेशाने शिक्षक. बायजू यांच्या वडिलांचं कायम एक म्हणणं होतं, की मुलांना मिळणार शिक्षण हे शाळेच्या बंद खोल्यांमध्ये नव्हे तर बाहेरील जगातूनच मिळतं. मल्याळम माध्यमातून बायजू यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी अभियांत्रिकीचं शिक्षण घेतलं. इंजिनिअरिंग झाल्यानंतर बायजू यांना चांगल्या पगाराची नोकरीही लागली.

'जेव्हा तुम्ही एखाद्या स्टेडियम मध्ये विद्यार्थ्यांना शिकवता तेंव्हा ते शिक्षण राहत नाही ते कलेचं सादरीकरण होतं'.

स्टेडियमच्या स्टेडियम हाऊसफुल !

बायजू यांचा गणित विषयात मोठा हातखंडा होता. आपल्या मित्रांना ते कायम गणितं शिकवत असतं. एकदा परदेशातून सहा महिन्यांसाठी बायजा बंगळुरू मध्ये आले होते. तेंव्हा त्यांच्या मित्रांच्या सांगण्यावरून त्यांनी तब्बल १ हजार विद्यार्थ्यांची त्यांनी कॉमन ऍडमिशन टेस्ट म्हणजे CAT ची तयारी करवून घेतली. त्यांचे सुरवातीचे वर्कशॉप्स फ्री असायचे. मात्र जेंव्हा विद्यार्थ्यांना त्याची शिकवण्याची पद्धत आवडायची तेंव्हा ते स्वतःच त्यांना पैसे देखील देऊ करायचे. विद्यार्थ्यांकडून मिळणार उत्तम प्रतिसाद पाहून बायजू यांनी आपली नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला आणि शिक्षण क्षेत्रात काहीतरी नवीन करण्याचा विचार केला. यानंतर बायजू हे चार ते पाच वेगवेगळ्या शहरांमध्ये शिकवायला लागलेत. बायजू यांची लोकप्रियता इतकी वाढली की अनेकदा त्यांनी स्टेडियम मध्ये देखील आपले वर्कशॉप घेतले आहेत. त्यांच्या विद्यार्थ्यांनीच त्यांच्या शिकवणीला बायजू'स क्लासेस असं नाव दिलं.

२०१५ मध्ये बायजू लर्निंग ऍप सुरु

मोठ्या मुलांना शिकवल्यानंतर बायजू याना एक गोष्ट माहिती पडली. भारतातील शिक्षणाचा पाय सुधारला पाहिजे ही त्यामागील संकल्पना. म्हणूनच सुरवातीला मोठ्या मुलांना शिकवल्यानंतर त्यांनी लहान मुलांना शिकवण्यास सुरवात केली. त्यानंतर २०११ मध्ये त्यांनी थिंक अँड लर्न नावाची कंपनी सुरु केली. यामध्ये उत्तम यश मिळाल्यानंतर बायजू रवींद्रन यांनी २०१५ मध्ये बायजू लर्निंग ऍप सुरु केलं. पहिल्याच वर्षी तब्बल ५५ लाख लोकांनी हे ऍप्लिकेशन डाउनलोड केलं. मोबाईल ऍप्लिकेशनच्या उत्तम प्रतिसादानंतर त्यांना अनेक गुंतवणूकदारांची देखील साथ मिळाली. ही साथ मिळाल्यानंतर बायजू यांच्या व्यवसायाची चांगलीच भरभराट झाली.

"आम्ही ज्या क्षेत्रात काम करतोय तिथे कोट्यवधी रुपये कमावण्यात मजा नाही, खरी मजा कोट्यावधी विद्यार्थ्यांना शिकवणे आणि शिक्षणाची पद्धत बदलणे" - बायजू रवींद्रन

पैसे कमविणे हा माझा उद्देश कधीच नव्हता

आपल्या व्यवसायाबद्दल बायजा रवींद्रन म्हणतात, ते ठरवून शिक्षक झालेत आणि योगायोगाने मोठे व्यावसायिक झालेत. अधिकाधिक पैसे कमविणे हा त्यांचा उद्देश कधीच नव्हता. आपण या समाजाला काहीतरी देणं लागतो, याच भावनेने त्यांनी त्यांच्या गावातील वंचितांच्या शिक्षणाची आणि आरोग्याची काळजी घेतली आहे. स्वतः लहानशा गावातूनच ते आल्याने त्यांना इतरांना मदत करणे हे स्वतःच कर्तव्य वाटतं. कोणताही व्यवसाय पैसे कमवण्याच्या उद्देशाने न सुरु करता समाज बदलण्याचा उद्देशाने सुरु करणं अत्यंत महत्वाचे असल्याचंही ते सांगतात.