

Development vs Environment
esakal
डॉ. अजित कानिटकर, आर्थिक, सामाजिक प्रश्नांचे अभ्यासक
केवळ नफ्या-तोट्याच्या आर्थिक गणितापलीकडे जाऊन उद्योग व्यवसायांची वृद्धी होतानाच पर्यावरणाचे जतन कसे होईल, हे पाहण्याची अवघड कसरत करतच वाटचाल करावी लागणार आहे. या पेचाचे स्वरूप विशद करणारा लेख.
'विकास का विनाश’ हा आता फक्त आता शालेय निबंधाचा विषय राहिला नसून तो तुमच्या-आमच्या रोजच्या जगण्याचा व चिंतेचा विषय झाला आहे. गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाच्या दोन न्यायाधीशांच्या खंडपीठाने याबद्दलचा एक महत्त्वाचा निर्णय दिला. निर्णयाचा विषय होता की, एका उद्योग समूहाने पंजाबमधील संगरूर येथील सिमेंटउत्पादन कारखान्यासाठी मिळालेल्या जमीन वापराच्या परवानगीमध्ये काही फेरफार करण्याची नवी सवलत ‘केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळा’ने दिली होती. अशी सवलत देऊन या कारखान्याच्या जवळच असलेल्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. त्यामुळे दिलेली सवलत रद्द करावी, अशी दाद न्यायालयाकडे मागितली गेली.