

History of Shaista Khan and Aurangzeb Relationship
esakal
छत्रपती शिवाजीराजे पन्हाळ्यात अडकले असताना उत्तरेकडून मुघलांचा एक लाखाचा सेनासागर स्वराज्यावर चाल करून आला. वारसाहक्काच्या रक्तरंजित संघर्षातून मोकळा होऊन सिंहासनारूढ होताच औरंगजेबाने शाहजादा मुअज्जमच्या जागी शायिस्ताखानास दख्खनचा सुभेदार नेमले आणि त्याला शिवाजीराजांच्या प्रदेशावर आक्रमण करण्यासाठी रवाना केले.
२२ नोव्हेंबर १६०५ रोजी जन्मलेल्या शायिस्ताखानाचे बादशाही तख्ताशी दोन पिढ्यांपासूनचे नातेसंबंध होते. शायिस्ताखान हा औरंगजेबाची आई मुमताज महल हिचा भाऊ असल्याने औरंगजेबाचा नात्याने तो ''मामा'' होता. त्याचे मूळ नाव मिर्झा अबू तालिब असे होते. जहांगीराने ‘शायिस्ताखान’, शाहजहानने ‘खानजहान’ आणि औरंगजेबाने ‘अमीर-उल उमरा’ ही पदवी देऊन त्याला गौरविले होते. खानजहान लोदीविरुद्ध; १६३०-३१ मध्ये निजामशाहीविरुद्ध; १६३५-३६ मध्ये शाहजीराजांविरुद्ध; १६५६ मध्ये कुत्बशाहीविरुद्ध अशा अनेक युद्धमोहिमांमध्ये त्याचा सहभाग होता. यापूर्वी त्याने बिहार, माळवा (तीनदा), गुजरात (दोनदा) आणि दख्खनचा सुभेदार म्हणूनही काम पाहिले होते. औरंगजेबाला गादी मिळवून देण्यात त्याचा मोठा सहभाग होता. औरंगजेबाच्या दख्खन सुभा जिंकण्याच्या स्वप्नपूर्तीसाठी अनुभवी शायिस्ताखानाला मोठ्या लवाजम्यासह पाठवण्यात आले होते.
शायिस्ताखानाच्या अधिपत्याखालील सैन्यात ७७००० घोडेस्वार, उत्कृष्ट पायदळ, हत्ती व विपुल सामुग्रीचा समावेश होता. या सैन्यतुकडीत ६८ हून अधिक मोठ्या सरदारांचा समावेश होता. त्यांपैकी २९ मुस्लिम तर ३९ हिंदू होते. यातील मुस्लिमांपैकी ५ तुर्की व उझबेकी, ३ हबशी, ३ पठाणी, १ पर्शियन व १ एतद्देशीय होते. हिंदूंपैकी १७ रजपूत व २२ मराठे होते. शायिस्ताखान २८ जानेवारी १६६० रोजी औरंगाबाद येथून निघाला आणि नैऋत्येकडे सुमारे ११० किलोमीटरचा १४ दिवसांचा प्रवास करून ११ फेब्रुवारी रोजी नगरला पोहोचला. २५ फेब्रुवारी रोजी तो नगरहून निघाला आणि मुघल साम्राज्याची दक्षिण सीमा असणारी भीमा नदी त्याने २९ फेब्रुवारी रोजी ओलांडली आणि स्वराज्यात प्रवेश केला.