

Tanjore Brihadeeswarar Murals
esakal
युनेस्कोच्या विश्वगौरव यादीत असलेले हे मंदिर आपल्या भव्यतेसाठी, शिल्पसौंदर्यासाठी बऱ्याच लोकांना माहिती असते, पण ह्या मंदिराच्या गाभाऱ्यावरच्या दोन मजल्यांवर दोन वेगवेगळे प्रदक्षिणा पथ आहेत आणि त्यापैकी पहिल्या मजल्यावर असलेल्या प्रदक्षिणा पथाच्या दगडी भिंतींवर हजार वर्षे जुनी भित्तिचित्रे आहेत, हे मात्र खूप कमी लोकांना माहिती असते. १०१० मध्ये जेव्हा बृहदीश्वर मंदिराची प्राणप्रतिष्ठा झाली, तेव्हाच ही मूळ चित्रे रेखाटली गेली होती. पण हजार वर्षांत त्यांच्यावर अनेक रंगांचे, काळाच्या उपेक्षेचे थर चढत गेले आणि मूळ चोलकालीन चित्रे त्याखाली झाकली गेली.
उत्तरेइतकीच दक्षिण भारतातली वस्त्रसंस्कृतीदेखील किती प्रगत होती हे दक्षिण भारतीय मंदिर शिल्पांमधून, तिथल्या मंदिरांमधल्या म्युरल पेंटिंग्समधून आपल्याला दिसतं. भारतीय वस्त्रसंस्कृतीचे दर्शन दगडातून जसे होते, तसेच रंगांमधूनही होते. चित्रकार त्याच्या रेघांमधून, वापरलेल्या रंगांमधून वस्त्राचा पोत सुचवू शकतो, त्याचा रंग दाखवू शकतो, नेसलेल्या वस्त्रातून दिसणारे अंगप्रत्यंग अधिक ठसठशीतपणे दाखवू शकतो, वस्त्राची पारदर्शिता, त्याचा तलमपणा दगडात कोरणे अत्यंत कष्टाचे आणि कौशल्याचे काम आहे, पण चित्रांमधून ते जास्त चांगल्या रीतीने दाखवता येते. तंजावूरच्या महान चोल सम्राट राजराज चोल ह्याने हजार वर्षांपूर्वी बांधलेल्या बृहदीश्वर मंदिराच्या पहिल्या मजल्यावरच्या भित्तिचित्रांमध्ये नेमके हेच दाखवण्यात तत्कालीन चित्रकार यशस्वी झाले आहेत आणि म्हणूनच ती चित्रे दगडी शिल्पांपेक्षाही जास्त खरी वाटतात.