

UN Women Report 2025
esakal
इराणमधल्या स्त्रियांच्या अधिकारांसाठी, तिथल्या इस्लामिक राजवटीशी गेली अनेक वर्षं लढणाऱ्या नर्गीस मोहमद्दी यांना पुन्हा एकदा, म्हणजे चौदाव्या वेळी अटक झाल्याची बातमी ताजी असतानाच यू एन विमेन आणि युरोपियन कमिशन यांनी संयुक्तरीत्या एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. मानवी हक्कांच्या संरक्षणासाठी लढणाऱ्या स्त्रिया, पर्यावरणासह विविध क्षेत्रातल्या सामाजिक कार्यकर्त्या आणि महिला पत्रकार यांच्या ऑनलाइन शोषणाबाबतचा हा अहवाल आहे. ‘युनेस्को’, ‘युनिव्हर्सिटी ऑफ लंडन’ आणि ‘इंटरनॅशनल सेंटर फॉर जर्नलिस्ट्स’ या संस्थांनी केलेल्या संशोधनाच्या आधारे हा अहवाल तयार झाला आहे. ११९ देशातल्या ६,४०० स्त्रियांच्या प्रतिसादांचा अभ्यास आणि विश्लेषण करून Tipping Point: The Chilling Escalation of Violence Against Women in the Public Sphere हा अहवाल सिद्ध केला आहे.
या अहवालानुसार, महिला पत्रकार किंवा वेगवेगळ्या सामाजिक चळवळीतल्या कार्यकर्त्या स्त्रियांपैकी ७० टक्के स्त्रियांना (म्हणजेच दहापैकी ७ जणींना) त्यांच्या कामाशी निगडित ऑनलाईन हिंसेला तोंड द्यावे लागते आहे. मुख्य म्हणजे हे डिजिटल हल्ले आता प्रत्यक्ष हिंसेलाही चालना देताहेत. थोडक्यात, स्त्रियांचं हे शोषण फक्त आभासी नसून, वास्तव आयुष्यातही या स्त्रियांवर अवमान, हल्ले, धमक्या आणि अत्याचाराचे प्रसंग येताहेत, असं या अहवालातून स्पष्ट झालं आहे.