
UN survival crisis
esakal
पहिल्या महायुद्धानंतर स्थापन करण्यात आलेला राष्ट्रसंघ शांतता प्रस्थापित करण्यात अपयशी ठरला. दुसऱ्या महायुद्धानंतर युद्ध रोखणे आणि जागतिक शांतता कायम ठेवणे, यासाठी संयुक्त राष्ट्रांची स्थापना झाली. मात्र, या संघटनेला मर्यादित यश मिळाले. बदलत्या परिस्थितीचे चित्र या संघटनेच्या रचनेमध्ये दिसून येत नाही, तर मोठ्या देशांकडून सुधारणांच्या मागणीमध्ये अडथळे आणण्यात येतात. या पार्श्वभूमीवर, संयुक्त राष्ट्रांचा अस्तित्वासाठीचा संघर्ष सुरू आहे.
संयुक्त राष्ट्रे ही जगातील सर्वांत मोठी आंतरराष्ट्रीय संघटना २४ ऑक्टोबर २०२५ रोजी ८०वा वर्धापन दिन साजरा करत आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर जागतिक शांतता व सहकार्याचे प्रतीक म्हणून या संघटनेची स्थापना करण्यात आली. मात्र, या आठ दशकांतील सर्व मोठ्या संकटामध्ये ही संघटना अपयशी ठरली आणि आता या संघटनेच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाला आहे. युक्रेनमधील युद्ध, गाझातील संघर्ष, हवामानबदल आणि कोरोनाची महासाथ अशा सध्याच्या अनेक घडामोडींमध्ये संयुक्त राष्ट्रांतील कालसुसंगतपणाचा अभाव आणि शक्तिहिनता वाढत्या प्रमाणात दिसून आली. संपूर्ण जगाला युद्धाच्या शापापासून मुक्त करण्याचे स्वप्न संयुक्त राष्ट्रांच्या स्थापनेवेळी समोर ठेवण्यात आले होते. मात्र, हे स्वप्न आता भंगलेले दिसत आहे.