

Geopolitics of Middle East
esakal
अमेरिका आणि चीनमधील संबंध आता केवळ स्पर्धा राहिलेले नाहीत, ते एका ‘शीतयुद्धात'' रूपांतरित झाले आहेत. इराणवर प्रहार करून अमेरिका आणि त्याचे मित्रराष्ट्र प्रभावीपणे पटलावरील ‘मोहरे साफ’ करत आहेत. इराणची सत्ता कमकुवत झाल्यास चीन ज्या ‘प्रतिकाराच्या शस्त्राला’, म्हणजेच हिजबुल्ला, हुथी आणि इतर दहशतवादी गटांना छुपा पाठिंबा देत होता, त्यांचा कणा मोडेल. यामुळे चीन कोपऱ्यात ढकलला जाईल व हीच अमेरिकेची रणनीती आहे...
या आठवड्यात तेहरानच्या आकाशात केवळ क्षेपणास्त्रांचा आवाज झाला नाही, तर अमेरिकेच्या बंकरबॉम्बने चिनी भाषेत लिहिलेल्या भविष्यातील दशकानुदशकांची एक ‘विमा पॉलिसी’ उधळून लावली. अनेक वर्षे जगाने वॉशिंग्टन आणि तेहरानमधील तणावाकडे १९७९च्या इस्लामिक क्रांतीचे एक स्थानिक स्वरूप म्हणून पाहिले. परंतु ताज्या हल्ल्यांनंतर नवी दिल्लीतील ‘रायसीना हिल’ वरून दिसणारे चित्र पूर्णपणे वेगळे दिसते आहे. भारताच्या धोरणात्मक भूमिकेच्या चिंतनात एक मत प्रबळ होत आहे, हा केवळ पश्चिम आशियातील प्रदेशावर झालेला हल्ला नव्हता. हा चीनच्या जागतिक महत्त्वाकांक्षेवर केलेला एक सुनियोजित ‘मार्जिन कॉल’ होता, म्हणजे चीनच्या बलस्थानाची चाचपणी होती. परीक्षा होती. गेल्या दशकभरात बीजिंगने इराणचा वापर आपली भू-राजकीय ‘इन्शुरन्स पॉलिसी’ म्हणून केला. अमेरिका पश्चिम आशियातील वाळवंटात अडकून पडली असताना, चीनला दक्षिण चीन समुद्रात कृत्रिम बेटे बांधण्यास आणि आफ्रिका व मध्य आशियात आपला ‘बेल्ट अँड रोड’ प्रभाव वाढवण्यास मोकळीक मिळाली. चीनसाठी इराण ही एक उत्तम ढाल होती. हा असा प्रादेशिक शक्तिशाली देश आहे, ज्याने अमेरिकी युद्धनौकांना तैवानच्या जलवाहतूक सीमांपासून दूर ठेवले आणि पेंटॅगॉनला अब्जावधी डॉलर अशा युद्धभूमीवर खर्ची घालावे लावले, जेथे चीनला संरक्षणाच्या भिंतीची गरज नव्हती. इराणसोबत २५ वर्षांचा, ४०० अब्ज डॉलरचा सामरिक करार करून बीजिंगने जगाला संकेत दिला होता, की चीन या क्षेत्राचा नवा ‘तारणहार’ आहे. परंतु या आठवड्यात, ती ‘विमा पॉलिसी’ कामाला आलेली नाही.