

Middle East War
esakal
अमेरिकेला जमिनीवरच्या युद्धात उतरण्यास इराण भाग पाडेल. जमिनीवरच्या युद्धात उतरताना दोन आव्हानं आहेत... एकतर ट्रम्प यांनी नवं युद्ध सुरू करणार नाही, हे आश्वासन देऊन सत्ता मिळवली आहे. अमेरिकेतील ताजा लोकांचा कलही युद्धाच्या विरोधात आहे. जमिनीवरचं युद्ध म्हणजे मोठ्या प्रमाणात हानी, याचा अनुभव अमेरिकी लोकांनी घेतला आहे. हे युद्ध इराण जिंकेल ही शक्यता नाही. इस्लामी राजवटीचं अस्तित्व टिकवणं इतकाच त्यांचा संघर्ष आहे.
अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्ला अली हुसेन खामेनेई यांचा मृत्यू झाला ही घटना पश्चिम आशियात युद्धाचा भडका उडवून देणारी आहे, तसंच या प्रदेशात अस्थिरतेचं एक नवं पर्व साकारणारी आहे. खामेनेई अमेरिकेसाठी कितीही खुपत असेल तरी ते एका सार्वभौम देशाचे प्रमुख होते त्यांना या प्रकारे संपवणं अमेरिका आंतरराष्ट्रीय कायदे, नियम यांना कवडीची किंमत देत नाही हेच दाखवणारं आहे. या दंडेलीला रोखण्याची सामर्थ्य आणि इच्छाही सद्या तरी कोणत्याही देशात किंवा जागतिक संघटनेत दिसलं नाही. यानंतरही ज्यासाठी अमेरिकेनं हे युद्ध सुरू केलं किंवा ज्यासाठी इस्राईलनं अमेरिकेला भरीला घातलं तसा सत्तापालट इराणमध्ये घडवणं सहजसाध्य नाही. एका अनिश्चित परिणाम असलेल्या युद्धात आगीत अमेरिकेनं पश्चिम आशियाला लोटलं आहे, त्याचे भीषण आर्थिक परिणाम सगळ्या जगावर होतील, हे उघड आहे.