

AI Avatar Recruitment Ethics
esakal
आज अनेक कंपन्या खर्च आणि वेळ वाचवण्यासाठी ‘एआय अवतार’चा वापर करत आहेत. ते इतके वास्तववादी आहे, की माणसाशीच बोलत असल्याचा भास होतो. प्रश्न हा आहे, की जिथे उमेदवाराने आपला प्रामाणिकपणा सिद्ध करायचा आहे तिथे समोरच्या बाजूला एक ‘खोटा’ चेहरा असणे कितपत नैतिक आहे?
सप्टेबर २०२५ ची एक सकाळ. एका नोकरीसाठी उत्सुक उमेदवाराला नेहमीप्रमाणे ई-मेल आला. मुलाखतीची व्हिडिओ लिंक, कॅलेंडर आमंत्रण आणि एका मोठ्या कंपनीत चर्चा करण्याचे आश्वासन - सर्व काही सामान्य होते; पण स्क्रीनवर लॉग-इन करताच काहीतरी विचित्र जाणवले. समोरची महिला हसत होती, मान डोलावत होती आणि प्रश्न विचारत होती; पण तिच्यात ‘माणुसकी’चा स्पर्श नव्हता. तिचे हास्य अतिशय मोजके, पापण्यांची हालचाल एका ठरावीक तालात आणि बोलणे इतके सफाईदार की जणू ती अदृश्य टेलिप्रॉम्प्टरवरून वाचत असावी. तिच्या बोलण्यात अडखळणे नव्हते, विचार करण्यासाठी घेतलेला विराम नव्हता. ती परिपूर्ण होती - आणि हीच गोष्ट भीतीदायक होती.