

तीरात्र शांघायच्या एका भव्य प्रदर्शन हॉलमध्ये नेहमीसारखीच शांत आणि निस्तेज होती. बंद पडलेल्या प्रदर्शनातील रिकामे बूथ, जमिनीवर पसरलेल्या गडद सावल्या आणि नीरव शांतता. हे दृश्य एखाद्या सायन्स फिक्शन किंवा भयपटातील असावे, असेच होते; मात्र त्या भयाण शांततेत अचानक काहीतरी हलले. अंधारात एक लहानसा, पांढरा शुभ्र रोबो एखाद्या नेत्याच्या जिद्दीने पुढे सरसावला. त्याचे नाव होते ‘अरबाय’ (Erbai) - मँडरिन भाषेत ज्याचा अर्थ होतो ‘दोनशे’. त्याच्या हालचालीत एक प्रकारचा आत्मविश्वास होता. तो सरळ जाऊन भिंतीला टेकून उभ्या असलेल्या, त्याच्याहून आकाराने कितीतरी मोठ्या ह्युमनॉइड (मानवाकृती) रोबोंच्या रांगेसमोर उभा राहिला. ते मोठे रोबो तिथे असे काही सुस्त पडले होते, जणू कारखान्यातील दिवसभराच्या अतोनात कष्टाने थकून गेलेले कामगार आता मान टाकून बसले आहेत.