

Fuel air explosives technology
esakal
डॉ. सुरेश कुलकर्णी, डॉ. राजेश ओहोळ
अतिसंहारक, अतिभयंकर ‘अल जझिरा अरेबिक’ यांनी केलेल्या एका शोध पाहणीचा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला. त्यानुसार ‘पॅलिस्टिनी नागरी संरक्षण’ विभागाने ऑक्टोबर २०२३ पासून गाझात २,८४२ पॅलेस्टिनींची ‘बेपत्ता’ म्हणून नोंद केली आहे. तज्ज्ञ व स्थानिकांच्या मते इस्राईलने उच्च तापमानाचे- ‘थर्मोबॅरिक’ बाँब वापरल्यामुळे या व्यक्तींच्या शरीराची वाफ झाली व त्यांचे अवशेषही सापडले नाहीत. जागतिक स्तरावर चर्चिल्या गेलेल्या या बातमीनिमित्ताने या अतिसंहारक शस्त्रप्रणालीविषयी...
अधिकृत अहवालांनुसार गाझा येथे झालेल्या इस्राईलच्या युद्धात शेकडो पॅलेस्टिनी लोक मारले गेले आणि त्यांपैकी बरेच जण बेपत्ता असल्याचे आढळून आले. लष्करी तज्ज्ञांना असा संशय आहे, की ‘थर्मोबॅरिक शस्त्रां’सारखी (ही शस्त्रे कधी कधी ‘व्हॅक्यूम’ किंवा ‘एअरोसोल बॉम्ब’ म्हणून ओळखली जातात.) उच्च तापमानाची शस्त्रे इस्राईलने या ठिकाणी वापरली असावीत. अशी शस्त्रे उच्च दाब आणि तीव्र उष्णता निर्माण करतात. त्यांमुळे ती मानवी ऊती जाळून टाकू शकतात आणि मानवी शरीर- सांगाडा सोडून- पूर्णपणे जाळू शकतात. अशा शस्त्रांमध्ये, हवेत मिसळलेले बारीक इंधनाचे थेंब (यालाच ‘एअरोसोल’ म्हणतात.) प्रज्वलित केले जातात. त्यामुळे एक मोठा अग्निगोळा आणि दीर्घकाळ टिकणारी उच्च दाबाची लाट (प्रेशर वेव्ह) तयार होतात. यांचा मारा वेगवेगळ्या लष्करी लक्ष्यांवर (त्यात माणसांचा समावेश आहे.) केला जातो. त्यानंतर व्हॅक्यूम इफेक्ट’ तयार होतो. पारंपरिक स्फोटकांवर आधारित शस्त्रांच्या तुलनेत या प्रकारच्या शस्त्रांचे घटक आणि त्यांनी होणारे नुकसान, दोन्ही खूप वेगळे आहे. या लेखात आपण थर्मोबॅरिक आणि इंधन-हवा स्फोटक शस्त्रांचे कार्य समजून घेण्याचा प्रयत्न करू.
‘थर्मोबॅरिक’ हा शब्द दोन ग्रीक शब्दांनी तयार होतो. ‘थर्मो’ म्हणजे उष्णता आणि ‘बारो’ म्हणजे दाब. इंधनयुक्त थर्मोबॅरिक स्फोटके ही पारंपरिक उच्च स्फोटकांच्या तुलनेत अधिक काळ टिकणारा उच्च दाब निर्माण करण्यास सक्षम असतात.