

Juror No.2 Movie Review
esakal
‘ज्युरर नंबर २’ चित्रपटामध्ये १२ ज्युरर एका अपघाताची चर्चा करतात, त्याचप्रमाणे ‘ज्युरर नं दोन’च्या मनात एक द्वंद्व सुरू आहे, त्यासंबंधी हा चित्रपट आहे. अर्थातचित्रपट घडतो त्याची ठिकाणे मोजकीच आहेत. नायक-नायिकेचे घर, कोर्ट, अपघात स्थळ. अशा बंदिस्त वातावरणामध्ये दिग्दर्शक आणि सिनेमॅटोग्राफरचे कसब पणाला लागते. दिग्दर्शक क्लिंट ईस्टवूड यांच्या या अभिजात चित्रपटाविषयी...
उत्तम चित्रपट कसा ओळखावा? पुढे काय वाढून ठेवले असेल, याचे सूतोवाच पहिल्याच शॉटमध्ये दिसले, तर तीच दर्जेदार चित्रपटाची ओळख ठरते. क्लिंट ईस्टवूड दिग्दर्शित ‘ज्युरर नं. २’ची श्रेयनामावली (टायटल्स) सुरू असतानाच न्यायदेवतेचे वेगळे चित्र दिसते, ज्यामध्ये न्यायदेवतेने डोळ्यावर पट्टी बांधली आहे; परंतु तिच्या हातातील तराजूचे एक पारडे जड आहे. न्यायदेवतेच्या दुसऱ्या हातामध्ये तलवार असते; परंतु चित्रातील तलवार उगारलेली आहे (म्यान केलेली नाही). याचाच अर्थ कोर्टामध्ये न्याय मिळणार आहे की अन्याय होणार आहे? टायटल्सनंतरच्या ओपनिंग सीनमध्ये नायिकेच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली आहे. नायक तिच्याच मागे उभा आहे, असा क्लोज-अप शॉट दिसतो. दिग्दर्शक क्लिंट ईस्टवूड अशा शॉटने सुरुवात करतो, याचा अर्थ हा नायक नायिकेला काही बाबतीत अंधारात ठेवणार, हे उघड आहे. नायक नायिकेच्या डोळ्यावरची काळी पट्टी काढतो आणि प्रेक्षकांच्या डोळ्यावरून (म्हणजे कॅमेऱ्याच्या समोरून) ती पट्टी दूर होते, असा शॉट दिसतो. आपलेही डोळे उघडणार आहेत, असा याचा अर्थ असेल? उत्तम दिग्दर्शकाचा चित्रपट कसा ओळखावा? ज्या चित्रपटामध्ये संवाद मोजकेच असतात आणि दृक-श्राव्य (audio visual) माध्यमाचा वापर करून दिग्दर्शक बरेच काही सांगू पाहतो.