

Ganeshotsav Cultural Tradition
esakal
प्रवीण दवणे - sakal.avtaran@gmail.com
कधी काळी गणेशोत्सवाच्या निमित्ताने गल्लीबोळांतून उलगडणारे सांस्कृतिक विश्व इतके समृद्ध होते, की त्या दहा दिवसांत भक्तीबरोबरच संगीत, साहित्य, नाटक, काव्य, लोककला आणि माणसामाणसांतील आपलेपणाचीही मेजवानी मिळत असे. आज उत्सवाचे स्वरूप बदलले आहे, त्याची साधने बदलली आहेत आणि आनंद व्यक्त करण्याच्या पद्धतीही बदलल्या आहेत... पण आजच्या बदलत्या काळात गणेशोत्सवाच्या मूळ सांस्कृतिक जाणिवेचा आणि मांगल्याचा धागा आपण कुठे हरवून तर बसत नाही ना, हा प्रश्न स्वतःला विचारण्याची वेळ आली आहे.
संदेवा तूंचि गणेशु!
सकलार्थमतिप्रकाशु
त ज्ञानेश्वर माउलींनी बुद्धीला ज्ञानाचा प्रकाश देणारा तो गणपती, असे म्हटले आहे. त्या विद्यादाता गणरायाचे आगमन होत आहे. गणरायाच्या आगमनाच्या चाहुलीतच, फुलांच्या आणि अष्टगंधाच्या सुगंधातून ते भरून उरले आहेत, याची अनुभूती येते.
एकत्र कुटुंबात आमचे बालपण गेल्यामुळे गणपतीचे दिवस, हे केवळ पूजा, आरती किंवा मोदकांच्या प्रसादापुरते मर्यादित नव्हते; तर ते एकमेकांच्या सोबतीने मखर करण्याचे, त्यासाठीच्या स्पर्धांचे आणि संगीतमय वातावरणाचे रम्य क्षण होते. स्वप्नवत वाटणारे असे ते दिवस... एका क्लिकवर रेडीमेड मखर घरात येण्याचे ते दिवस नव्हते. मखर साकार होत असतानाच जणू अरूप आनंदच आकाराला येत असे. स्वयंपाकघरातील गोडधोड करण्याची लगबग! पहाटेची सर्वांची ती जाग! अंगणातील ती सडासंमार्जने! स्त्री आणि पुरुष अशा कुठल्याही रेषा नसलेल्या केवळ नात्यांची आकाश जपणाऱ्या त्या रांगोळ्या! सारे काही प्रसन्न...
नाशिकच्या त्या जुन्या वाडा संस्कृतीत गणेशोत्सवाचा आनंद आम्ही समग्रपणे अनुभवला. उत्सवादरम्यान प्रत्येक चौकात आणि वेगवेगळ्या गल्लीबोळांत रस्त्यावर सिनेमा लावला जात असे. रस्त्यावर बसून सिनेमा पाहता येणे ही आता अनुभवताही येणार नाही, अशी एक चैन होती. अनेक जुने-नवे चित्रपट आम्ही असेच रस्त्यावर पाहिले. मधल्या चौकात किंवा एखाद्या भिंतीवर कोणता सिनेमा दाखवणार आहे, ते खडूने लिहिलेले असे. ‘आराधना’, ‘आया सावन झूम के’, ‘कटी पतंग’, ‘हिम्मत’ असे त्या वेळच्या तरुणांच्या दिलाची धडकन असणाऱ्या नट-नट्यांचे सिनेमे अगदी फुकट पाहायला मिळत असत. रस्त्यावरच रात्री नऊ-साडेनऊच्या सुमारास मधे पांढरा पडदा लावून, त्याच्या दोन्ही बाजूंना शेकडो जण अगदी मजेने सिनेमाचा आनंद घेत. गंमत म्हणजे, अनेकदा रिळ तुटले की सिनेमा मध्येच थांबे आणि कर्कश्य शिट्ट्यांचा प्रचंड पाऊस पडे. काळोखात घुमणाऱ्या त्या शिट्ट्यांमध्ये प्रेक्षकांची उत्सुकता दडलेली असे. पुन्हा सिनेमा सुरू झाला, की जणू विजयाचा आनंद साजरा केल्यासारख्या शिट्ट्या वाजत... परंतु हे होत असताना कोणताही गडबड-गोंधळ किंवा अनुचित प्रकार घडत नसे. तो घडू नये म्हणून कोणतीही पोलिस संरक्षण व्यवस्था लागत नसे. लोक आपोआपच, सहजपणे आनंद घेताना त्याचा रसभंग होणार नाही, याची काळजी घेत असत. आर्थिक ओढगस्तीने पिचलेली माणसे गणपतीच्या दिवसांत तेवढाच मनोरंजनाचा आनंद मनापासून घेत असत.