
सतीश लळीत
तळकोकणातील ‘मालवणी मुलूख’ म्हणून ओळखला जाणारा सिंधुदुर्ग जिल्हा निसर्ग, बोली, लोककला, संस्कृती, परंपरा याबाबतीत आगळावेगळा आहे. मालवणी माणूस आतिथ्यशील, सश्रद्ध पण चिकित्सक आणि परंपराप्रिय आहे. नव्याचा स्वीकार करायचा, पण जुन्याचेही जतन झाले पाहिजे, अशी येथील वृत्ती. केवळ भौगोलिक वेगळेपण नव्हे, तर जीवनपद्धती, बोलीभाषा, आचारविचार, खाद्यसंस्कृती, निसर्ग, लोककला, धार्मिक आस्था, रूढी-परंपरा, सण-उत्सव या सगळ्याच बाबतीत मालवणी मुलखाचे वेगळेपण, इथली संस्कृती डोळ्यात भरावी अशी आहे.
महाराष्ट्राच्या प्रादेशिक विभागांपैकी कोकण प्रदेश हा केवळ भौगोलिक, नैसर्गिकदृष्ट्या वेगळा आहे एवढेच त्याचे वैशिष्ट्य नाही, तर सांस्कृतिकदृष्ट्याही तो फारच आगळावेगळा आहे. कोकण म्हणजे पश्चिमेला अरबी समुद्र आणि पूर्वेला सह्यगिरी यामधली सातशेहून अधिक किलोमीटर लांब आणि सरासरी ७५ किलोमीटर रुंद अशी चिंचोळी पट्टी.