
आपण पुरंदराचा तह समजून घ्यावयास हवा. त्यासाठी १६५७ मधील मुघल–आदिलशाही तहाची पार्श्वभूमी पाहणे आवश्यक आहे. त्या तहानुसार, १६३६च्या मुघल–आदिलशाही तहात आदिलशाहस जो निजामशाही मुलूख मिळाला होता, तो त्याने मुघलांना सुपूर्त करावयाचा होता. परंतु, त्याच वेळेस शाहजहान आजारी पडला आणि औरंगजेब वारसा युद्धात गुंतल्यामुळे आदिलशाहाने त्या तहाची अंमलबजावणी केली नाही. शिवाय शिवाजी महाराजांनी त्या अनिश्चिततेचा फायदा घेत बहुतेक निजामशाही मुलूख हस्तगत केला.
शिवाजी महाराजांचे तहासाठी प्रयत्न
कर्माजी (किंवा गिर्माजी) या आपल्या विश्वासू अधिकाऱ्याच्या हाती शिवाजी महाराजांनी एक सविस्तर हिंदी पत्र देऊन त्यास जयसिंहाकडे पाठविले. जयसिंहास कर्माजीने वारंवार विनंती केली की, ‘‘एकदा तरी हे पत्र ऐका आणि त्यास उत्तर द्या.’’ अखेर जयसिंहाने पत्रातील मजकूर ऐकून घेतला. त्याचा आशय होता, ‘‘मुघल सैन्याने या डोंगराळ भागात त्रास सहन करण्याऐवजी विजापूरावर चाल केली, तर अधिक लाभदायक ठरेल.’’ त्यावर जयसिंहाने कठोर भाषेत प्रत्युत्तर देत संपूर्ण शरणागतीची मागणी केली.
या उत्तरानंतरही शिवाजी महाराजांनी वारंवार पत्रे पाठवून कर भरण्याची आणि काही किल्ले मुघलांना देण्याची तयारी दाखविली. जयसिंहास हे ठाऊक होते की, शिवाजी महाराजांना पूर्ण निराश केले गेले, तर त्याचा उलट परिणाम होऊ शकतो. त्याला सुज्ञतेने हे जाणविले की, शिवाजी महाराज आता दोन पर्यायांपैकी एक निवडण्याच्या निर्णायक टप्प्यावर आहेत. पहिला म्हणजे जयसिंहाशी अंतिम चर्चेचा प्रयत्न करणे आणि दुसरा म्हणजे, जर जयसिंहाकडे केलेली शेवटची विनंती फोल ठरली, तर आदिलशाहीकडे वळून कोकणातील काही भाग त्यांना परत देत त्यांच्या सहकार्याने मुघलांविरुद्ध एकत्रित लढाई उभी करायची. खात्रीलायक गुप्तहेरांनी जयसिंहास कळविले की, आदिलशाहाने शिवाजी महाराजांना सर्वतोपरी साहाय्याची ग्वाही दिली आहे. त्यामुळे जयसिंहाने जाणले शिवाजी महाराजांना हताश करून त्यांच्या हातात आदिलशाहाशी खुल्या एकीचे कारण देणे, हे मूर्खपणाचे ठरेल.