
विवेक पंडित
१९८४ पासून सुमीने स्वीकारलेली गुलामी अन् शोषण मला मात्र एक संघटक म्हणून, माणूस म्हणून वर्ष २०२४ पर्यंत अस्वस्थ करीत होते. मी तब्बल चाळीस वर्षांनी राहुर गावात आदिवासींच्या जमिनी मुक्त करायला गेलो होतो, तेव्हा सुमीची चौकशी केली. थोड्याच वेळात एक वृद्ध महिला समोर आली. चाळीस वर्षांनंतरही सुमीने मला क्षणातच ओळखलं नि घट्ट मिठी मारली. २०२४मध्ये आमच्या संघटनेने धनदांडग्यांच्या कब्जातून आदिवासींच्या जमिनी मुक्त केल्या. पहिलीच जमीन मुक्त झाली ती सुमीची. १९८४ पासून जी ‘सल’ मला बोचत होती, त्यातून चाळीस वर्षांनी माझी मुक्तता झाली.
जिथे जिथे संघटना रुजत-वाढत होती त्या त्या भूमीतले निद्रिस्त अंगार भूमी दुभंगून बाहेर येत होते. यातूनच हळूहळू वन विभाग व पोलिसांचे अत्याचारही समोर यायला लागले. अनेक आदिवासी पिढ्यान्-पिढ्या जंगलातल्या जमिनीवर राहून शेती करीत होते; परंतु वन विभागाकडून त्यांना गुन्हेगार ठरविण्यात येत होते. पीक कापल्यानंतर बेकायदेशीर हप्ते मागितले जात होते. झोपडी बांधण्यासाठी झाडाची फांदी जरी कापून आणली, तरी वन कर्मचाऱ्यांकडून जुलूम असायचाच.