
विवेक पंडित
pvivek2308@gmail.com
आदिवासींच्या मनात पोलिसांबद्दल प्रचंड भीती होती. देपिवलीला वेठबिगार मुक्तीचं शिबिर सुरू असताना पोलिसांना पाहून रमेश सातवी हा वेठबिगार त्या शिबिरातून पळून जंगलात फास घेण्यासाठी गेला होता. शेवटी त्याला कसंतरी सोडवून परत आणलं होतं. तोही या छोट्याशा मोर्चात सहभागी झाला होता. घोषणांमुळे आणि पोलिसांना आम्ही उलट उत्तर करू शकतो, यामुळे त्याच्यामध्ये प्रचंड बळ आलं. तो एखाद्या शूरवीराप्रमाणे पोलिसांशी भांडताना आम्ही पाहिलं...
वसई तालुक्यातून मुक्त झालेले वेठबिगार आणि त्यांचे कुटुंबीय असे मिळून पाच-एकशे लोक मोर्चाला येतील, असा आमचा अंदाज होता. २७ जुलै १९८३ला मोर्चा निघाला. काही जण मिळेल त्या वाहनाने, तर काही चालतसुद्धा विरार स्टेशनला पोहोचले. एकाच्याही पायात वहाण नव्हती. मोजून एकशेबत्तीस वेठबिगार विरारला आले. अनेकांना गावातून मालकांनी निघूच दिलं नव्हतं. पण मालकांच्या प्रयत्नांना नेटाने हाणून पाडत पिढ्यान््पिढ्यांच्या मुजोरीला आपण धक्का देऊ शकतो, हा आत्मविश्वास आदिवासींमध्ये एव्हाना निर्माण झाला होता. आमच्याकरिता हेच महत्त्वाचं होतं...