
ल्हाधिकाऱ्यांनी गावा-गावात जायला आम्हाला बंदी केली. संघटना करायचा, संचार करण्याचा, अभिव्यक्त होण्याचा आमचा अधिकार, आम्हाला भारतीय संविधानाने जे जे म्हणून मूलभूत अधिकार दिले, ते ते सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी पायदळी तुडवले. त्यांच्या या आदेशाचा भंग करायचा, म्हणजेच महात्माजींनी सांगितलेला ‘सविनय कायदेभंग’ करायचा, असं आमचं ठरलं. मग त्यासाठी जर काही शिक्षा होणार असेल, तर ती भोगायचीही तयारी आम्ही ठेवली. येईल त्या परिस्थितीला तोंड द्यायची आमची तयारी होती. अनेक गोष्टी त्यामध्ये साध्य झाल्या. जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशामुळे लोक आमची अधिक काळजी घेऊ लागले.
पोलिस कधीही आम्हाला पकडायला येऊ शकतील, मालक आमच्यावर कधीही हल्ला करतील, अशी भीती लोकांच्या मनात निर्माण झाली होती; परंतु या भीतीमुळेच लोकांचं आमच्यावरचं प्रेम अधिक गडद झालेलं आम्हाला पाहायला मिळालं. अनेकदा संघर्ष, विपरीतता, विरोध याच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेले ऋणानुबंध अधिक दृढ होतात. संघटना बांधणीसाठी हे एकत्व आवश्यक असतं. या संपूर्ण प्रवासात आदिवासी आणि आम्ही यांच्या अद्वैताची अनुभूती आम्हाला घेता आली. एका बाजूने संघटना करण्याची प्रक्रिया लोक आम्हाला शिकवत होते अन् आम्ही ती शिकत जात होतो.
गावा-गावात गेल्यावर रात्रीच्या वेळी सर्व जण एकत्र असायचो. जी कणेरी शिजेल ती सर्वांनी प्यायची. रात्रभर नाच चालायचे, लोक गप्पा मारायचे, अनुभव सांगायचे... मेढ्यातल्या एका पाड्यात एक अतिशय संतापजनक अशी कथा आम्हाला जयरामने सांगितली.