
गावा-गावांमध्ये ज्या ज्या मार्गाने दडपशाही करता येईल, आदिवासींची, शेतमजुरांची कोंडी करता येईल, ती करण्याचे सर्व प्रयत्न मालक वर्ग करीत होता. वसई पूर्व भागातील या सर्व हालचालींचं केंद्र देपिवली झालं होतं. देपिवलीमध्ये मुक्त झालेल्या वेठबिगारांची संख्या जास्त होती. विरोधही देपिवलीमध्येच जास्त होता. श्रमजीवी संघटनेच्या विरोधात मालकांनी ‘शेतकरी संघटना’ सुरू केली, ज्याचे अध्यक्ष शेतकरी कामगार पक्षाचे ‘भाई’ शिवराम पाटील होते. संघटनेत फूट पाडण्याचा प्रयत्न प्रत्येक गावात मालक वर्गाकडून होत होता. देपिवली गावात त्यांना यश आलं. नाऊ चौधरी हा आमचा एक आधार पहिल्या आठ-दहा दिवसांतच संघटनेतून त्यांनी फोडला अन् शेतकरी संघटनेत त्याला सामील करून घेतलं.
त्याला आमच्या विरोधात वापरायला सुरुवात केली. मांडवी सभेत तसेच इतरही सभेत त्याचा सत्कार करू लागले. कालपर्यंत जे नाऊला विचारतही नव्हते ते आता त्याला ‘साहेब’ म्हणू लागले होते. मात्र, नाऊ आदिवासींच्या नजरेतून उतरला. गावा-गावांत जसा अन्याय-अत्याचार वाढत होता, तसे त्याला प्रत्युत्तर द्यायला आदिवासी तयार होऊ लागले होते. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांमध्ये चैतन्य सळसळू लागलं होतं.