

Trump 2.0 Foreign Policy
esakal
डोनाल्ड ट्रम्प यांनी २०२५मध्ये अमेरिकेच्या अध्यक्षपदाचा दुसऱ्यांदा कार्यभार स्वीकारला. पहिल्या कार्यकाळापेक्षा दुसऱ्या कार्यकाळात ते जास्त आक्रमक असून, त्यांच्या धोरणांमुळे आतापर्यंतच्या आंतरराष्ट्रीय व्यवस्थेमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. त्यांच्या धोरणांमध्ये दीर्घकालीन दृष्टिकोनाचा अभाव असून, सर्व धोरणांकडे व्यवहारवादी पद्धतीने पाहण्यात येत आहे. त्याचा फायदा प्रतिस्पर्धी देशांना होत असून, अमेरिकेच्या मित्रदेशांमध्ये अस्वस्थता आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या दुसऱ्या कार्यकाळाला नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले. ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळात अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणावर झालेला परिणाम केवळ ठळकच नव्हे; तर मूलभूत आणि संरचनात्मक स्वरूपाचा ठरलेला दिसतो. ‘ट्रम्प २.०’ केवळ पहिल्या कार्यकाळाची पुनरावृत्ती नसून, ते अधिक आत्मविश्वासपूर्ण, आक्रमक आणि स्पष्ट असा ‘अमेरिका फर्स्ट’ दृष्टिकोन घेऊन पुढे आले आहेत. या एका वर्षात अमेरिकेने मित्रदेशांशी असलेली पारंपरिक बांधिलकी सैल केली, प्रतिस्पर्धी शक्तींशी नव्या प्रकारे व्यवहार केले आणि जागतिक व्यवस्थेतील स्वतःच्या भूमिकेची पुनर्व्याख्या केली. ट्रम्प यांच्या परराष्ट्र धोरणात यश आणि वाद, व्यवहार्यता आणि अनिश्चितता; तसेच वैयक्तिक मुत्सद्देगिरी आणि संस्थात्मक परंपरा यांच्यात सतत संघर्ष दिसून येतो. या संघर्षातून उभे राहिलेले चित्र हे अमेरिकेच्या जागतिक भूमिकेतील दीर्घकालीन बदलांचे द्योतक आहे.