

Trump, Putin and Xi Jinping
esakal
ट्रम्प, पुतीन आणि शी जिनपिंग यांच्या बहुचर्चित त्रिपक्षीय बैठकीत मैत्रीचा गाजावाजा झाला; पण बहुपक्षीयतेच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. अजेंडाच नसलेल्या बैठकीतून काही ठोस निष्पन्न होईल, अशी अपेक्षाही नव्हतीच.
डोनाल्ड ट्रम्प हे व्लादिमीर पुतीन यांचे आणि पुतीन हे शी जिनपिंग यांचे मित्र असतील, तर ट्रम्प आणि शी जिनपिंग मित्र आहेत का? गणितातील संच सिद्धांतानुसार असे असणे आवश्यक नाही. मात्र, मागील आठवड्यात शी जिनपिंग यांनी चिनी राजशिष्टाचाराला छेद देत विमानतळावर ट्रम्प यांना कडकडून मिठी मारली, तेव्हा अनेक नियम फोल ठरल्याचे भासले. काही दिवसांपूर्वीच दुर्मीळ खनिजांच्या निर्यातीवर निर्बंध घालण्यावरून अमेरिका चीनवर आगपाखड करत होती, तर प्रगत चिप्सच्या निर्यातीवरील अमेरिकेच्या नियंत्रणाला बीजिंगने ‘आर्थिक दडपशाही’ म्हटले होते. चीनच्या शेन्झेन येथे पार पडलेल्या ‘एपेक’ परिषदेच्या पार्श्वभूमीवर शी जिनपिंग, ट्रम्प आणि पुतीन यांची ‘अभूतपूर्व’ म्हणून रंगवलेली त्रिपक्षीय बैठक प्रत्यक्षात फुसका बार ठरली! अजेंडाच नसलेल्या बैठकीतून काही ठोस निष्पन्न होईल, अशी अपेक्षाही नव्हतीच. पुतीन यांनी बैठकीचा प्रस्ताव मांडला, ट्रम्प यांनी तो उचलून धरला आणि बीजिंगने संमती दिली, एवढेच.