
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील राजकीय संबंध सर्वश्रुत आहेत. ‘हाऊडी मोदी’ आणि ‘नमस्ते ट्रम्प’ प्रकारानंतर तर दोघांच्या समर्थनाचे पूल बांधले गेले; पण आता दोघांच्या मैत्रीच्या नात्यात मतभेदाचे वारे वाहू लागल्यासारखी परिस्थिती आहे. ट्रम्प यांनी भारतीय मालावर २५ टक्के आयात शुल्क लादण्याची घोषणा केल्याने भारत-अमेरिका यांच्यातील परस्पर संबंध सतत बदलत असल्याचे दिसून येत आहेत. दुसरीकडे ट्रम्प आणि मोदी यांच्या राजकीय संबंधांचाही कस लागणार आहे.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील राजकीय संबंध अलीकडच्या इतिहासातील सर्वात नाट्यमय अन् ठळकपणे दिसून येणारी घटना म्हणता येईल. त्यांच्या द्विपक्षीय संबंधांमध्ये परस्पर मैत्री, जाहीर प्रेम आणि धोरणात्मक पाठिंबा यांचे भव्य प्रदर्शन करण्यात आले; मात्र त्यात ठोस प्रगती किंवा आर्थिक संबंधांची भरभराट कधीच दिसून आली नाही. राजनैतिक घोषणांखेरीज ट्रम्प-मोदी यांच्यातील संबंध वैयक्तिक परराष्ट्र धोरण आणि परस्पर राजकीय संबंधांचे प्रदर्शन याचे उत्तम उदाहरण राहिले आहे.