
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकताच चार दिवसांचा पश्चिम आशियाचा दौरा केला. त्यांच्या या दौऱ्यातून निर्माण झालेले भूराजकीय धक्के पुढील काही वर्षे जाणवत राहील, असे दिसून येत आहे. ट्रम्प यांच्या याआधीच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ आणि जो बायडेन यांच्या अध्यक्षपदाच्या काळामध्ये पश्चिम आशियामध्ये काळजीपूर्वक संबंध ठेवण्यात आले होते. मात्र, ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील या दौऱ्यामध्ये त्यांनी निःसंशयपणे आर्थिक संबंधांवर भर दिला. यामध्ये अनेक आर्थिक करार त्यांनी मांडले, काही वादग्रस्त प्रस्तावही त्यांनी समोर केले.
यामध्ये व्यक्तीकेंद्रीत राजनैतिक कार्यपद्धती दिसून आली. जागतिक सत्तासमतोलामध्ये आणि वैचारिक स्पर्धांमध्ये पश्चिम आशिया हा महत्त्वपूर्ण विभाग राहिला आहे. त्यामुळे ट्रम्प यांच्या या दौऱ्यामुळे अमेरिकेच्या पश्चिम आशियाविषयक धोरणांवर होणाऱ्या परिणामांचे बारकाईने मूल्यमापन करायला पाहिजे, असे मत आंतरराष्ट्रीय संबंधांतील अनेक अभ्यासक, निरीक्षक आणि विश्लेषकांनी व्यक्त केले आहे.