Premium| Ukraine war: अलास्का परिषदेनंतर युक्रेन रशिया युद्ध थांबण्याच्या मार्गावर
श्रीकांत परांजपे
saptrang@esakal.com.
युद्ध आणि युरोपचे भवितव्य
युक्रेन आणि रशिया यांच्या दरम्यान गेली तीन वर्षे चाललेला संघर्ष नुकत्याच अलास्का येथे झालेल्या अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि सोव्हिएत राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या भेटीनंतर थांबण्याच्या मार्गावर असल्याची लक्षणे दिसू लागली आहेत. त्यानंतर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की आणि काही युरोपीय नेते ट्रम्प यांच्याबरोबर चर्चा करण्यास तातडीने वॉशिंग्टनला जमले. अलास्कामध्ये झालेल्या चर्चेनंतर युरोपमधील अस्वस्थता तेथील नेत्यांना वॉशिंग्टनला घेऊन आली आणि यातूनच आता युरोपचे भवितव्य ठरेल...
रशिया-युक्रेन संघर्ष रशियाच्या धोरणांमुळे सुरू झाला असे नेहमीच सांगितले जात असले, तरी याबाबतची रशियाची भूमिका समजून घेणे गरजेचे आहे. युक्रेनमधील रशियाचा हस्तक्षेप दोन संकल्पनांच्या संदर्भात समजू शकतो : एक, हस्तक्षेपाच्या वैधतेच्या मुद्द्याशी संबंधित आहे आणि दुसरा राष्ट्रीय सुरक्षेच्या चिंतेशी संबंधित आहे. वैधतेचा मुद्दा १९८९मध्ये पूर्व युरोपमध्ये झालेल्या बदलाच्या प्रक्रियेतून उद्भवतो. पूर्व युरोपीय क्रांती, ज्यामध्ये विघटन आणि नवीन राष्ट्र-राज्यांची निर्मिती झाली ती वांशिक राष्ट्रवाद आणि स्वयंनिर्णयाच्या हक्कांच्या अधिकारावर आधारित होती. या संकल्पनेच्या आधारे युगोस्लाव्हियाचे विघटन, चेकोस्लोव्हाकियाचे विभाजन, जर्मनीचे एकीकरण आणि अखेरीस सोव्हिएत युनियनचे विघटन झालेले दिसते.