

संजय करकरे
sanjay.karkare@gmail.com
पवनी अभयारण्यातील वाघाच्या एका व्हिडिओने नुकतीच मोठी खळबळ उडवली. आपल्या पाच पिल्लांसह जंगलातून जाणाऱ्या एका वाघिणीला अतिउत्साही पर्यटकांनी अक्षरशः घेरले. वाघांसोबत सेल्फी आणि त्यांचे फोटो-व्हिडिओ काढण्यासाठी झुंबड उडाली. त्यानंतर वन विभाग खडबडून जागा झाला आणि कारवाई सुरू झाली. पण एक लक्षात घ्यायला हवे, की वाघांचे संरक्षण आपलीच नैतिक जबाबदारी आहे. चुकून एखादी दुर्घटना घडली तर व्याघ्र पर्यटनाला धक्का बसेल आणि ते परवडणारे नाही.
गेल्या वर्षीच्या अखेरच्या दिवशी नागपूर जिल्ह्यातील उमरेड करांडला पवनी अभयारण्यातील वाघाच्या एका व्हिडिओने मोठी खळबळ माजवून दिली. हा व्हिडिओ समाज माध्यमांवर अतिशय वेगाने सर्वत्र पसरला. एक वाघीण आपल्या पाच पिल्लांसह जंगलातून जात असल्याचा हा व्हिडिओ होता. या व्हिडिओत वाघाच्या या सर्व कुटुंबाच्या पुढे व मागे खुल्या जिप्सीमध्ये बसलेल्या पर्यटकांचा गराडा सर्वांच्या नजरेत भरणारा होता.
दोन दिवसांनंतर वृत्तपत्रांतून बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर वन विभाग खडबडून जागा झाला. पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या अखत्यारीत उमरेडचे अभयारण्य येत असल्याने या व्याघ्र प्रकल्प प्रशासनाने संबंधित गाइड, जिप्सीचालक तसेच पर्यटकांवरही दंडात्मक कारवाई केली.