डॉ. अजित कानिटकरनोकऱ्यांचा प्रश्न हा केवळ उद्योग-व्यवसायातील संधींचा नसून शिक्षणपद्धतीतून शिकून बाहेर पडणाऱ्या युवक- युवतींच्या मूलभूत कौशल्याबद्दलचा आहे. गरज आहे ती उपलब्ध संधी आणि क्षमता यांचा मेळ घालण्याची. .गेली अनेक वर्षे न चुकता सर्व अर्थमंत्री एक मुद्दा भरभरून मांडतात. तो म्हणजे देशाला दरवर्षी कमीत कमी एक कोटी नवे रोजगार, नोकऱ्या निर्माण कराव्या लागतील. वर्षाच्या शेवटी हा एक कोटींचा आकडा जेमतेम १०-२० लाखांवर थबकतो. दुसरीकडे पदवी पूर्ण झाल्यानंतर किंवा उच्च शिक्षणाचा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर कुठे, कधी आणि केव्हा नोकरी मिळणार, हा विद्यार्थ्यांपुढचा महत्त्वाचा प्रश्न असतो.देशातील सर्व आघाडीच्या उत्तम संस्थांमध्ये पुढील तीन महिन्यांचा हंगाम नोकऱ्यांचा सुगीचा असतो. इंग्रजीत placement season हा गोंडस शब्द. त्यासाठी विद्यार्थी-विद्यार्थिनी स्वतःच पैसे खर्च करून चकचकीत माहितीपत्रके तयार करतात. स्वतःला येणाऱ्या व प्रसंगी न येणाऱ्या कौशल्याची आकर्षक मांडणी करतात. नोकरीच्या बाजारपेठेत स्वतःला एकप्रकारे असे ‘विकावेच’ लागते. अनेक खासगी कंपन्या शेवटपर्यंत पुरेशी माहिती न देता अनिश्चितता वाढवतात. नोकरीच्या बाजारपेठेत त्यांचेच वर्चस्व असल्याने कधी, केव्हा, कोणाकडे जायचे याचे वेळापत्रक ते ठरवतात. त्यांच्या अधिकाऱ्यांची मोठी भाषणे होतात. आमची कंपनी कशी सर्वोत्तम आहे, असे तेही मीठमसाला लावून सांगतात. ही नोकरीपूर्व भाषणे म्हणजे pre-placement talks. .ही नमनाची नांदी झाल्यावर अर्ज, गटचर्चा व मुलाखत. हे सर्व सोपस्कार झाल्यानंतर जर नशीब असेल तर हातामध्ये तुम्ही नोकरीवर अमुक दिवशी या असे पत्र मिळते. पण असे पत्र मिळणे म्हणजे नोकरीची शाश्वती नाही. कारण गेल्या तीन चार वर्षांत अनेक नामांकित उद्योगांनीही नोकरीची पत्रे हातात ठेवून मुलांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. त्यांना वाट पाहात बसावे लागते.थोडक्यात ‘नोकरी द्या हो नोकरी’ असे म्हणत भारतातील तमाम तरुणवर्ग पुढचे तीन महिने वाट पाहणार आहे. वरील उदाहरण खासगी नोकऱ्यांबद्दल व मोठ्या प्रसिद्ध महाविद्यालयाबद्दल. सरकारमध्ये नोकरभरतीची स्थिती याहूनही वाईट आहे. केवळ दिल्लीतील यूपीएससीची परीक्षा एक अपवाद. आपल्या राज्यासकट अनेक राज्य सरकारांनी नोकरभरतीवर अनौपचारिक व अघोषित बंदी घातली आहे. आपल्या राज्यातही दोन वर्षांपूर्वी एमपीएससी परीक्षा होऊन निवड झालेल्या विद्यार्थ्यांना कोणत्या ठिकाणी रुजू होऊन कामाला सुरुवात करायची, याची वाट पाहण्यात दोन वर्षे झाली आहेत. त्यामुळे दुसरी नोकरी शोधावी की हातात असलेले नोकरीचे पत्र सांभाळून ठेवावे, या द्विधा मनःस्थितीत अनेक तरुण आहेत. एकेका पदासाठी निदान पाचशे तरी अर्ज करणारे आहेत. पदवीच नव्हे तर पीएच.डी झालेलेही मिळेल ते काम घेण्याच्या हाराकीरीत आहेत. .Employment Opportunity : राज्यात 5 हजारांवर रोजगारनिर्मिती; 6 महिन्यांतील लक्ष.उत्तम पदव्यांना साजेसे काम नाही. भारतातील प्रसिद्ध व्यवस्थापनसंस्था आणि तंत्रज्ञान संस्थांमध्ये ही स्थिती. लाखो कोटीची पॅकेजेस मिळतात. त्याचा गवगवा होतो. असे केवळ अपवादात्मकच चार-पाच टक्के असतात. बाकी सर्व जण ‘आप कतारमें है’ हा संदेश ऐकत थांबतात. चांगली माणसे द्या हो!एका परदेशी तज्ज्ञाने प्रथम जो शब्द वापरला व नंतर अनेकांनी तो लोकप्रिय केला तो म्हणजे युवाशक्तीचा लाभांश. (demographic dividend) त्या तज्ज्ञाच्या मते भारतात १९८० च्या दशकात सुरु झालेला हा युवाशक्तीचा आविष्कार २०४० पर्यंत टिकणार आहे. २०४० फार लांब नाही. त्यामुळे त्या शब्दाचा सतत करून पाठ थोपटून घेणेही थांबवले पाहिजे. कारण हा शब्द प्रचलित केल्यानंतर त्यावेळी विशीतील अनेकांची वये ३५ ते ४०च्या घरात सरकून ती कोणत्याही नोकरीशिवाय बेरोजगार आहेत. वास्तव आहे ते असे की, Not in Education, Employment, Training अशा स्थितीतील अनेक तरुण हा एकप्रकारे सुप्त टाइमबॉम्ब आहे. छोट्या व मध्यम दर्जाच्या शिक्षणसंस्थात तर परिस्थिती याहून गंभीर आहे. काहीच दिवसापूर्वी धाराशिव येथील एक शिक्षणक्षेत्रातील कार्यकर्ते सांगत होते. त्यांच्या जवळच्या महाविद्यालयात पटावर विद्यार्थिसंख्या १५०० आहे. दररोजची उपस्थिती फक्त ५० ते ७०!.एकीकडे नव्या नोकऱ्या मिळणे दुष्कर, तर दुसरीकडे हातात असलेल्यांच्याही नोकऱ्या वय वर्ष ५८ किंवा ६० म्हणजे निवृत्तिकाळापर्यंत टिकतील, अशी शक्यता खूप कमी झाली आहे. .Employment: देशातील बेरोजगारीचा प्रश्न कसा सुटणार? तज्ज्ञांनी सरकारला केल्या महत्त्वाच्या सूचना .खासगी क्षेत्रात वेगाने बदलणारे तंत्रज्ञान, बाजारपेठेत नवे उतरलेलें स्पर्धक, असलेल्या वस्तू अथवा सेवांना नव्याने उपलब्ध होणारे सोपे व जास्त चांगले पर्याय, देशापेक्षा परदेशातून आयात केलेल्या वस्तूंचा आपल्या बाजारपेठेतला पूर, त्यामुळे येथील उद्योग व्यवसायांना आलेली मंदी इतकेच काय तर अमेरिका- रशिया-युक्रेन-बांगलादेश-कोरिया या देशांमध्ये होत असलेल्या उलथापालथीच्या घटना.त्यामुळे नोकऱ्या व उद्योग व्यवसायांवर कधी तेजी व कधी मंदीचे सावट येऊ शकते. त्यामुळे हातातील नोकरी कशी टिकवायची याची अनेकांना चिंता आहे. AI हा विषय २०२४ मध्ये भरपूर चर्चिला गेला. त्याचे काय परिणाम होणार ते येत्या काही काळात कळेलच. हे सर्व विवेचन हे उच्चशिक्षित, बुद्धिमान व महत्वाकांक्षी असलेल्या व महागड्या संस्थांमध्ये ज्यांना शिकण्याची संधी मिळाली याबद्दल आहे. पण जे मध्यम क्षमतेचे, मध्यम कौशल्यांचे व सरासरी बुद्धिमत्तेचे आहेत त्यांना नोकऱ्या कुठे व कशा मिळणार? जिल्हा व तालुक्यांच्या गावी बीए, बी. कॉम, बीएस्सी व प्रसंगी इंजिनिअरिंगचे सुद्धा अभ्यासक्रम पूर्ण केलेला खरोखरी नोकरीचे कोणतेही पर्याय उपलब्ध नाहीत. .हा सर्वच प्रश्न गुंतागुंतीचा आहे. आपल्या शिक्षणपद्धतीबद्दलही मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे. याचे कारण नोकरीचा प्रश्न हा केवळ उद्योग-व्यवसायातील संधी यावर अवलंबून नसून या शिक्षणपद्धतीतून शिकून बाहेर पडणाऱ्या युवक युवतींच्या मूलभूत कौशल्याबद्दल मोठे प्रश्न उत्पन्न करणारा आहे.दुसरीकडे कोणत्याही तज्ज्ञाला विचारा- एकच तक्रार कायम असते. ‘आम्हाला चांगली माणसे मिळत नाहीत.’ म्हणजे एकीकडे प्रशक्षित माणसांची चणचण व दुसरीकडे अशा अर्धवट शिकलेल्या व कोणतेही फारसे कौशल्य नसलेल्या व्यक्तींना सामावून घेण्याचे आव्हान. या जोडीला आपली समाज म्हणून कामाबद्दलची ‘मानसिकता’. आज शहरात उत्तम सुतार, वीज जोडणी तंत्रज्ञ, रंगारी, यंत्रे चालवणारे, फरश्या बसवणारे असे अनेक तज्ज्ञ आवश्यक आहेत. शेतीत हाताने काम करणारे अल्पमतात आहेत. दुर्दैवाने हाताने कष्टाची कामे करणाऱ्याला आपण एक समाज म्हणून आदर व मानसन्मान देत नाही. नव्या वर्षात निदान हे तरी करता येईल का?.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.