
नरेश हाळणोर
मुंबई, पुणे, नागपूर या शहरांच्या विकासाला औद्योगिक वसाहतींनी चालना दिली. या शहराच्या विकासानंतर सुवर्ण त्रिकोण म्हणून उत्तर महाराष्ट्रातील नाशिककडे पाहिले गेले. परंतु, प्रशासकीय अन् राजकीय उदासीनता आणि कंपन्यांमध्ये युनियनबाजीच्या नावाखाली राजकीय ‘वजनदारां’नी वर्चस्व राखण्यासाठी जे काही करायचे ते केल्याने या शहराच्या औद्योगिक विकासाला खीळ मात्र बसली.
सुदैवाने काही शहरातील उद्योजकांना गुन्हेगारांच्या ‘खंडणीं’ना सामोरे जावे लागले, तसा प्रकार नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात नाही, ही बाब दिलासादायक आहे. ‘हप्तेखोरी’ची लागण मात्र आहे. ज्यात राजकीय वरदहस्त आपले उखळ पांढरे करून घेतात.
नाशिक सहकारी औद्योगिक वसाहत (नाईस) या संस्थेच्या माध्यमातून नाशिक औद्योगिक वसाहतीची मुहूर्तमेढ १९६२ मध्ये रोवली गेली. त्यानंतर १९६५ मध्ये सातपूरच्या परिसरामध्ये औद्योगिक वसाहत वसली.