

Urdu Ghazal Poetry
esakal
भीमराव पांचाळे - sakal.avtaran@gmail.com
शब्द तेच असतात; पण उच्चार बदलला, नुक्ता चुकला किंवा विराम चुकीच्या जागी घेतला, की अर्थाचा अनर्थ होतो. गझलेच्या दोन ओळींत अर्थाचा अथांग सागर सामावलेला असतो. शब्दांइतकेच त्यांचे उच्चार आणि विरामही महत्त्वाचे ठरतात. एखादी छोटीशी चूकही अर्थाचा विपर्यास करते; तर कधी विनोदाची पखरण...
‘गागर में सागर’...
दोन ओळींच्या एकाच शेरात अर्थाचा समुद्र साठवण्याची क्षमता असणारा काव्य प्रकार म्हणजे गझल... प्रश्न पडतो की, अर्थाचे असे महत्त्व जिच्या ठायी आहे अशा गझल काव्यात अर्थाचा अनर्थ किंवा विपर्यास होण्याची शक्यता संभवत असेल का?
उत्तर आहे ‘हो’...
एखादा शब्द चुकीचा उच्चारला किंवा चुकीच्या पद्धतीने तोडला किंवा पॉज जरी चुकीच्या ठिकाणी घेतला तरी अर्थ बदलतो. अर्थाचा अनर्थसुद्धा होतो. हे सगळ्या भाषांमध्ये घडते; पण उर्दू भाषेत जरा अधिकच, असे माझे निरीक्षण आहे.
काही शब्द आणि त्यांचे वाक्यांमध्ये झालेले उपयोग बघू. -
आप मेरे अज़ीज़ दोस्त हैं
आप मेरे अजीज़ दोस्त हैं
बारकाईने बघितले तर लक्षात येईल, की पहिल्या वाक्यात दोन्ही ‘ज’खाली नुक्ते (टिंब) आहेत; तर दुसऱ्यामध्ये एकाखालीच. या नुक्त्यांच्या असण्या आणि नसण्यामुळे पहिल्या वाक्याचा अर्थ होतो - ‘तुम्ही माझे प्रिय मित्र आहात’ आणि दुसऱ्या वाक्याचा अर्थ होतो - ‘तुम्ही माझे नामर्द मित्र आहात.’
आहे की नाही भांडणाला फुकटचे निमंत्रण!
असेच काहीसे खालील शब्दांबाबतसुद्धा होईल -
अज़ल (म्हणजे अनादिकाल)
आणि
अजल (म्हणजे मृत्यू)
तसेच,
कार (म्हणजे काम, कार्य)
आणि
क़ार (म्हणजे गहराई, खोली... ‘का’खाली नुक्ता)
कार्य या अर्थाच्या ‘कार’साठी ‘ग़ालिब’ म्हणतात -
हवस को है निशाते - कार क्या क्या
न हो मरना तो जीने का मज़ा क्या
गहराई या अर्थाच्या ‘क़ार’साठी ‘अदम’ साहेब लिहितात -
सतह के शोर से न घबराओ
क़ारे - दरिया खामोश होता है
अहाहा... क्या कहने!
***