
मोहसीन महदावी व्हरमाँटमध्ये अमेरिकेच्या विदेश विभागाच्या कचेरीत उभा होता. अमेरिकेचं नागरिकत्व त्याला मिळणार होतं. तो १० वर्षं ग्रीन कार्डवर होता, नागरिकत्वाच्या सर्व अटी त्याने पूर्ण केल्या होत्या... मुलाखत हा एक उपचार तेवढा बाकी होता. पोलिस आले. त्याला बेड्या घातल्या. अज्ञात ठिकाणच्या कोठडीत त्याला घेऊन गेले. पोलिसांकडे आरोपपत्र नव्हतं...
दोन दिवसांनी अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांनी पत्रकारांना सांगितलं, की अमेरिकेच्या इस्राईलविषयक धोरणाला विरोध केल्याबद्दल मोहसीनला अटक झालीय. अमेरिकन विद्यापीठांत ज्यू विरोध वाढला असून तो आटोक्यात आणण्याचं सरकारचं धोरण आहे. इस्राईल हा अमेरिकेचा मित्र देश आहे, त्याला मदत करणं हे अमेरिकेचं धोरण आहे. मोहसीनला नागरिकत्व दिलं जाणार नाही, त्याला देशाबाहेर घालवलं जाईल.