

Usgaon social movement
esakal
महाराष्ट्र सरकारच्या विरोधात आम्ही वेठबिगारांच्या मुक्तीचा आणि पुनर्वसनाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात नेला होता. सर्वोच्च न्यायालयाने त्यात जातीने लक्ष घातले आणि आम्हाला अत्यंत सकारात्मक प्रतिसाद मिळू लागला होता. जिल्हा प्रशासन सजग झाले होते... याचदरम्यान ठाण्याचे जिल्हाधिकारी बदलले होते. भास्करराव पाटील हे जिल्हाधिकारी म्हणून ठाण्यात आले, त्यामुळे वेठबिगारांच्या पुनर्वसनाच्या प्रक्रियेला गती आली होती.
वेठबिगारांच्या पुनर्वसनाबाबत जिल्हाधिकारी भास्करराव पाटील यांच्यासोबत आमची बैठक सुरू होती. तो दिवस होता, ६ जानेवारी १९८७चा... त्या बैठकीला भिवंडीला उपविभागीय अधिकारी अजय भूषण पांडे आणि ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौतम चॅटर्जी हेदेखील उपस्थित होते. चर्चेदरम्यान मुक्त वेठबिगारांसाठी वीटभट्टी सुरू करता येईल, ही कल्पना मी मांडली. बरेचसे वेठबिगार वेठबिगारी करत असताना मालकांच्या वीटभट्टीवर काम करायचे, त्यामुळे त्याबाबतचे कौशल्य त्यांच्यापाशी होतेच. अभिनव सहकारी वीटभट्टी अशाच कल्पनेतून साकारली होती. तशीच दुसरी सुरू करता येईल, असा विचार होता. त्यातूनच सामूहिक, सहकारी पद्धतीवर वीटभट्टी सुरू करण्याची कल्पना पुढे आली. माझा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांसह सर्वांच्या पसंतीस पडला; पण प्रश्न होता जागेचा. भास्कररावांनी मला विचारले, ‘‘जागा कुठाय?’’