
वाल्मीक थापर हे भारतातील एक अग्रगण्य व्याघ्रसंवर्धक, लेखक आणि निसर्गप्रेमी होते. त्यांनी आपल्या आयुष्याची पाच दशके वाघांच्या संरक्षणासाठी समर्पित केली. त्यांचे निधन अलीकडेच ३१ मे रोजी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी झाले.
दिल्लीतील एका परिषदेला हजर होतो. व्याघ्र संवर्धनाची मोठी चर्चा यात सुरू होती. दुसऱ्या दिवशी वाल्मीक थापर यांचे तेथे आगमन झाले. या आगमनानंतर संपूर्ण वातावरणच बदलून गेले. सरिस्कामधील वाघ संपल्याचे जगापुढे त्या सुमारास आल्याने राजस्थान आणि एकूणच तेथील वन्यजीवांच्या संरक्षणाचे कसे धिंडवडे उडाले, हे थापर यांनी स्पष्टपणे बोलून दाखवले. वाघांच्या संरक्षणासाठी आणि संवर्धनासाठी कमालीचे पोटतिडकीने बोलणारे थापर त्या वेळेस बघितले होते. या परिषदेत त्यांनी देशातील व्याघ्र संवर्धनाची स्थिती, वनविभागाचे योगदान, त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन तसेच निधीची कमतरता यावर प्रकाश टाकला होता.