

Varsha Gaikwad interview on Mumbai development
esakal
मुंबईचा विकास मुंबईकरांसाठीच व्हावा, भांडवलदारांसाठी नाही, अशी ठाम भूमिका मांडत मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांनी महापालिका निवडणुकीसाठीचे धोरण स्पष्ट केले. पाणी, आरोग्य, शिक्षण, सार्वजनिक वाहतूक आणि लोकशाही मूल्यांच्या संरक्षणासाठी काँग्रेस लढणार असल्याचे त्या म्हणाल्या. ‘सरकारनामा’च्या प्रतिनिधी दीपा कदम यांनी त्यांची घेतलेली मुलाखत
मुंबईचे वैभव एकाच माणसाच्या घशात घातले जात आहे. कचरा व्यवस्थापनापासून सर्वत्र अदानींचे नाव दिसतेय. अगदी ‘दत्तक वस्ती’ योजनेचे कंत्राट सुद्धा मराठी मुलांना न देता मोठ्या कंपन्यांना दिले जात आहे. मुंबई ही मुंबईकरांची आहे, ती काही मूठभर भांडवलदारांच्या फायद्यासाठी नाही. मुंबईकरांना ‘डपिंग ग्राउंड’वर टाकायचे आणि मोक्याच्या जमिनी बिल्डरांना द्यायच्या, हे काँग्रेस चालू देणार नाही. आमचा विकासाला विरोध नाही, पण विकासाच्या नावाखाली होणाऱ्या ‘अदानीकरणाला’ विरोध आहे. धारावीकरांना तिथल्या तिथेच हक्काची घरे मिळाली पाहिजेत. अपात्रतेच्या नावाखाली धारावीकरांना मिठागरांच्या जमिनीवर किंवा शहराबाहेर फेकून देण्याचा सरकारचा कट आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. धारावी ही केवळ एक झोपडपट्टी नाही, तर ते एक लघुउद्योगांचे केंद्र आहे. इथल्या उद्योजकांना आणि चर्मोद्योगाला संरक्षण मिळाले पाहिजे. सरकार विकासकाच्या फायद्याचा विचार करत आहे, आम्ही धारावीकरांच्या हिताचा विचार करत आहोत.