
संध्या गोखले
sandhyago@gmail.com
स्वतःच्या कलेत ओतप्रोत गुंतलेल्या वासुदेव गायतोंडे यांच्यासारख्या सिद्धहस्त चित्रकाराच्या चित्रांमधून विरक्ती जाणवत राहते. रंगांचे थर लिंपण्यामध्ये मग्न असणाऱ्या या कलंदर माणसाच्या कलाप्रवासातला दाह रसिकांपर्यंत पोहोचला नाही. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने नुकतंच ‘गायतोंडे : बिटवीन द टू मिरर्स’ पुस्तक प्रकाशित करण्यात आलं आहे. कायमच विजनवासात राहणं पसंत केलेल्या गायतोंड्यांची प्रतिमा आता त्यांच्या कलेसोबत कायम गुंफली जाईल
‘वा सुदेव गायतोंडे’ या नावाचा विचार करताना त्यांची चित्रंच डोळ्यांसमोर येतात. लाल, हिरवा, पिवळा (क्वचित निळा) रंगातला कॅनव्हासभर पसरलेला बेस-वॉश - मग त्यावर त्याच जातकुळीतल्या रंगात गिरवलेले अपरिमित आकार किंवा त्याच रंगातल्या छटांच्या सरमिसळीतला ध्यानमग्न विराम. बर्वे, साबावाला, रझा, आरा किंवा अकबर पदमसींचीसुद्धा चित्रं डोळ्यासमोर येतात; पण आपल्यापैकी कितीजण फोटो दाखवल्यावरही त्यांना ओळखू शकतील? बहुतांशी पाश्चिमात्य संगीतकार आणि चित्रकारांच्या संदर्भातही तसंच होतं. उदाहरणार्थ ‘रॉथको’ म्हटल्यानंतर त्याचे चौकोनी लांबच लांब पसरलेले रंगीत आकृतीबंध डोळ्यांसमोर येतात.