

Vegan Diet Benefits
esakal
सायली नाईक - sakal.avtaran@gmail.com
‘वीगन’ आहार फॅशन म्हणून स्वीकारू नका आणि भीतीपोटी नाकारूही नका. आधी त्यामागचे पोषणशास्त्र समजून घ्या. आपण कोणता आहार घेतो, यापेक्षा त्यातून शरीराला आवश्यक ऊर्जा, प्रथिने, जीवनसत्त्वे, खनिजे, चांगले चरबीचे स्रोत आणि फायबर योग्य प्रमाणात मिळत आहेत का, हे अधिक महत्त्वाचे आहे.
‘वीगन’ हा केवळ आहाराचा ट्रेंड नसून एक जीवनशैली आहे. ‘वीगन’ आहारामध्ये मांस, मासे, चिकन, अंडी; तसेच दूध, दही, पनीर, चीज, तूप, लोणी आणि मध यांसारखे सर्व प्राणिजन्य पदार्थ पूर्णपणे टाळले जातात. त्याऐवजी डाळी, कडधान्ये, सोया, टोफू, संपूर्ण धान्ये, भाज्या, फळे, सुकामेवा आणि विविध प्रकारच्या बियांचा आहारात समावेश केला जातो. योग्य पद्धतीने नियोजन केलेला ‘वीगन’ आहार फायबर, भाज्या, फळे, कडधान्ये आणि वनस्पतीजन्य पोषकद्रव्यांनी समृद्ध असू शकतो. त्यामुळे वजनाचे व्यवस्थापन, पचनसंस्था आणि हृदयाच्या आरोग्यासाठी त्याचे काही फायदे होऊ शकतात.
पर्यावरण संवर्धन आणि प्राणी कल्याणाच्या दृष्टिकोनातूनही काही व्यक्ती ‘वीगन’ जीवनशैली स्वीकारतात, मात्र अशा आहाराची दुसरी बाजूही तितकीच महत्त्वाची आहे. प्राणिजन्य पदार्थ पूर्णपणे बंद केल्यामुळे जीवनसत्त्व बी-१२, लोह, कॅल्शियम, डी जीवनसत्त्व, झिंक, आयोडीन, ओमेगा-३ आणि प्रथिनांसारख्या पोषकघटकांकडे विशेष लक्ष द्यावे लागते. त्यातही जीवनसत्त्व बी-१२ बाबत अधिक जागरूक राहणे आवश्यक आहे. नैसर्गिक वनस्पतीजन्य पदार्थांमधून पुरेशा आणि विश्वासार्ह प्रमाणात बी-१२ मिळत नसल्याने फोर्टिफाइड पदार्थ किंवा पूरक आहाराची आवश्यकता भासू शकते. म्हणूनच, आहारतज्ज्ञ म्हणून मी नेहमी सांगते, ‘वीगन म्हणजे हेल्दी’ एवढेच समीकरण नसून ‘योग्य नियोजन केलेला वीगन आहार आरोग्यदायी पर्याय ठरू शकतो,’ असे म्हणणे अधिक योग्य ठरेल.