

China India relations
esakal
चीनची वाटचाल महासत्ता बनण्याच्या दिशेने वेगाने सुरू असल्याचे अलीकडील जागतिक घडामोडींमधून स्पष्ट दिसून येते. बीजिंगमध्ये झालेल्या डोनाल्ड ट्रम्प आणि शी जिनपिंग यांच्या शिखर परिषदेनंतर त्याबाबतच्या चर्चेला अधिक धार मिळाली. अशा पार्श्वभूमीवर माजी परराष्ट्र सचिव आणि चीनचे अभ्यासक विजय गोखले यांचे ‘चायनाज वॉर्स : द पॉलिटिकल अॅण्ड डिप्लोमसी बिहाइंड इट्स मिलिटरी कोअर्शन’ हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. चीनने आतापर्यंत केलेली युद्धे, त्यांची राजकीय उद्दिष्टे आणि कूटनीतिक डावपेचांवर ते सखोल प्रकाश टाकते. त्यातून चीन-भारत संबंधांचे महत्त्वाचे पैलू समोर येतात. विशेषतः १९६२च्या भारत-चीन युद्धामागील चिनी नेतृत्वाची मानसिकता, ‘ग्रे-झोन वॉरफेअर’सारख्या रणनीतींचा वापर आणि भविष्यात भारतासमोर उभे राहू शकणारे धोके यांचा पुस्तकातून अभ्यासपूर्ण वेध घेण्यात आला आहे.
माओच्या उदयानंतर कम्युनिस्ट चीनने पहिल्या तीस वर्षांत पाच वेळा युद्ध केले. त्यामध्ये कोरिया युद्ध (१९५०), तैवान सामुद्रधुनी संघर्ष (१९५८), १९६२ मधील भारतासोबतचे युद्ध, सोव्हिएत रशियासोबतचा संघर्ष (१९६९) आणि १९७९ मधील व्हिएतनामसोबतच्या संघर्षाचा समावेश आहे. १९७९ नंतर काही अपवाद वगळता चीनने कुठल्याही देशासोबत थेट युद्ध केले नाही. १९९०मध्ये शीतयुद्ध समाप्त झाल्यानंतर चीनने ‘ग्रे-झोन वॉरफेअर’ म्हणजे प्रत्यक्षात लष्करी शक्तीचा वापर न करता आर्थिक शक्तीचा अधिक वापर करण्याची रणनीती आखली. ती आजतागायत चीन राबवत आहे. लेखकाने आपल्या पुस्तकाच्या माध्यमातून चीनने लढलेल्या चार युद्धांमागील कारणे, हेतू आणि त्यांची रणनीती काय होती याबाबतचा उलगडा करण्याचा प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे १९६२चे भारत-चीन युद्ध आणि त्यानंतर दोन्ही देशांच्या सीमेवर उद्भवलेल्या तणावपूर्ण संघर्षावर लेखकाने अधिक लक्ष केंद्रित केले आहे. या युद्धाचा इतिहास लिहिताना चीनने कायम स्वतःला पीडित व भारताला आक्रमक देश असल्याचे जगाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे तटस्थ व भारतीय अंगाने या युद्धाचे विश्लेषण लेखकाने केले आहे.