
विराट कोहली फलंदाज म्हणून नि:स्वार्थी होता, तसाच कप्तान म्हणून तो स्पष्ट व रोखठोक होता. संघाचं हित त्याच्यासाठी नेहमी सर्वोच्च होतं. फलंदाजी असो वा कप्तानी किंवा क्षेत्ररक्षण, त्याची मैदानावरील एकाग्रता केवळ अचाट होती. त्याची देहबोली प्रतिस्पर्ध्याला सतत आव्हान देणारी असायची. म्हणून विराट मला गेल्या दशकातील क्रिकेट जगतावर सर्वाधिक छाप सोडणारा खेळाडू वाटतो आणि भारताचा सर्वांत यशस्वी कसोटी कप्तानही. त्याच्या कसोटी कारकिर्दीकडं पाहता ‘बंदे में था दम’ असंच म्हणावं लागेल...
माझी २००८मध्ये एका कार्यक्रमात निवड समिती अध्यक्ष दिलीप वेंगसरकरशी भेट झाली असता, त्यानं मला विराट कोहलीचं नाव सांगितलं होतं. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय १९ वर्षांखालच्या संघानं विश्वकरंडक जिंकला असल्यानं मला त्याचं नाव समजलं होतं. दिलीप वेंगसरकर जेव्हा कोणाचं नाव कौतुकानं घेतो, तेव्हा लक्ष द्यावं लागतं. कारण एकतर दिलीप वेंगसरकर कोणाही क्रिकेटपटूंचं सहजी कौतुक करत नाही आणि दुसरं तो खरा पारखी आहे! त्याला गारगोटी आणि हिऱ्यातील फरक बरोबर कळतो! एखादा खेळाडू पोत्यानं स्थानिक क्रिकेटमध्ये धावा करत असला आणि त्याला दिलीपनं पाहिलं, तर त्याला तो खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकू शकेल का नाही याचा अंदाज लगेच यायचा. म्हणून दिलीपनं विराट कोहली नावाच्या फलंदाजामध्ये दम असल्याचा अंदाज वर्तवला तेव्हा मला ती टिप्पणी गांभीर्याने घेण्यावाचून पर्याय नव्हता.