
चा जर्सी क्रमांक १८ आणि एका मोठ्या यशाने त्याला १८ वर्षे तपश्चर्या करायला भाग पाडले. अखेर त्याची प्रतीक्षा संपली आणि यश हाती लागले; पण त्या सुखाला मोठ्या दु:खाची झालर लागली. होय, ही कहाणी आहे विराट कोहलीच्या आयपीएल स्पर्धा जिंकण्याची. १८ वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर २०२५च्या टाटा आयपीएल करंडकाला त्याचा हात लागला. आनंदाच्या बहरात तो त्याच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या चाहत्यांना विसरला नाही. त्याच उत्साहात त्याने यशात तुम्ही पण तेवढेच हकदार आहात सांगताना उद्या आपण बंगळुरू शहरात आनंदोत्सव साजरा करायला भेटू, असे विराट म्हणाला. बंगळुरूच्या चाहत्यांनी विराटच्या हाकेला साद देत चिन्नास्वामी मैदानाबाहेर आपल्या विजयी संघाचे स्वागत करायला तुफान गर्दी केली. अपेक्षेपेक्षाही झुंबड फारच जास्त झाल्याने गर्दीत चेंगराचेंगरी झाली आणि ११ क्रिकेट चाहत्यांना आपला जीव गमवावा लागला आणि सुखाला दु:खाची झालर लागली.
मला आठवतो तो प्रसंग जेव्हा २०२१ सालच्या इंग्लंड दौऱ्यातील कसोटी मालिका कोविड महामारीने अर्धवट सोडावी लागली होती. मालिकेतील उरलेला एकमेव कसोटी सामना खेळायला भारतीय संघ इंग्लंडला गेला होता. २२ जुलै २०२२ रोजी कॉफी प्यायला आणि गप्पा मारायला मी विराट कोहलीला भेटलो होतो. ठरवले होते की गप्पा मारताना क्रिकेटचा विषय आपण काढायचा नाही. ठरल्याप्रमाणे मँचेस्टरला भेटल्यावर पहिला अर्धा तास आम्ही क्रिकेटवर एक शब्दही बोललो नाही. नंतर विराटनेच क्रिकेटचा विषय चालू करून भरपूर माहिती दिली होती. त्याने भारतीय संघाचे नेतृत्व करायला लागल्यावर वेगवान गोलंदाजांच्या फळीला तयार करायला काय उपाययोजना केल्या इथपासून ते २०१९ विश्वचषक स्पर्धेतील संघ निवडताना काय चुका केल्यापर्यंत सगळे मनमोकळेपणाने सांगितले. त्या गप्पांदरम्यान विषय आयपीएलचा निघाला. इतकी वर्षे अथक प्रयत्न करूनही विजेतेपदाने बंगळुरू संघाला हुलकावणी दिली होती. संघ बदलायचा विचार मनात येऊन गेला नाही का, असे विचारता विराटने काही गोष्टी सांगितल्या होत्या.