
डॉ. सदानंद मोरे
महाराष्ट्र राज्यनिर्मितीला २०१० मध्ये ५० वर्षे पूर्ण झाली. नेमक्या याच सुवर्णमहोत्सवी वर्षात काँग्रेसमधील धुसफूस शिगेला पोचली असल्याने ते वर्ष साजरे होऊ शकले नाही. एकही महत्त्वाचा प्रकल्प या दरम्यान राबवला गेल्याचे वा पूर्ततेस पोहोचल्याचे दिसले नाही. पुढे २०२० मध्ये राज्यनिर्मितीला साठ वर्षे पूर्ण झाल्यामुळे हीरकमहोत्सव साजरा करायची संधी होती. पण नेमक्या याच काळात कोरोना महासाथीचे थैमान सुरू होते. त्यामुळे ती संधीही हुकलीच. आता सध्याच्या २०२५ वर्षात राज्यनिर्मितीला ६५ वर्षे होत आहेत. अजून दहा वर्षांनी येणाऱ्या अमृतमहोत्सवात महाराष्ट्र कसा असावा, यासाठी आजच संकल्पाची गरज आहे...
महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका नुकत्याच पार पडून भाजप, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार सत्तारूढ झाले आहे. एखादा राजकीय चमत्कार घडला नाही तरच येत्या पाच वर्षांनंतर सत्तांतर होऊ शकेल. म्हणजेच सध्या महाराष्ट्रात स्थिर सरकार आहे असे म्हणायला वाव आहे. या सरकारने आता निदान अमृतमहोत्सवी २०३५ या वर्षात महाराष्ट्र कसा असला पाहिजे याचे, एक संकल्पनाचित्र समोर ठेवून त्यानुसार तसे संकल्प करायला हरकत नाही. योगायोगाने केंद्रातही भाजपचेच सरकार असल्याने हे नक्कीच शक्य कोटीतील वाटते. सरकारला जे योग्य वाटते ते सरकार करेल अन् ते त्याला करू द्यावे. तथापि इतरांनी स्वस्थ बसून फक्त पाहत राहावे, असा त्याचा अर्थ नाही.