
काही काही गावांना मुळातच एक नैसर्गिक सुंदरतेची देणगी मिळालेली असते. गर्द झाडीत लपलेलं, नदीच्या काठावर वसलेलं, धार्मिकतेचा परीस-स्पर्श लाभलेलं, वास्तू-स्थापत्य शैली अंगावर बाळगणारं सोंडे नावाचे गाव हे याच पंक्तीत मोडतं. अनेक जण या गावचा उल्लेख सोदे असाही करतात. कर्नाटक राज्यातील उत्तर कन्नड जिल्ह्यातील एक छोटसं गाव. सिरसीपासून अगदीच जवळ. नकाशावर या गावाचं अस्तित्व शोधणंदेखील मुश्कील इतक हे लहान. गाव साधं; पण धार्मिक अंगाने याचे महत्त्व कैकपटींनी मोठं. कारण या गावात उभा आहे महान संत वादिराज स्वामींचा एक सुरेख मठ आणि प्राचीन वास्तू-स्थापत्याचा आविष्कार दाखविणारे ‘त्रिविक्रम मंदिर’. त्यामुळे मंदिर अभ्यासकांसाठी आणि पर्यटकांसाठी हे मस्ट व्हिझीट असे हे ठिकाण. विशेषतः कोस्टल कर्नाटकच्या भटकंतीसाठी जाणाऱ्या पर्यटकांनी तर पाहायलाच हवे. आपली महाराष्ट्रातली बरीचशी मंडळी हमखास कोस्टल कर्नाटकच्या सफारीला जाताच असतात. हा टक्का दरवर्षी वाढतच असतो.