
लोकशाही ही संपूर्ण जगभर अनुसरली जाणारी शासनप्रणाली असली असे आपण समजत असलो, तरी प्रत्यक्षात जगभर लोकशाही शासनप्रणाली अनुसरली जातेच असे नाही. गेल्या काही वर्षांमध्ये जगभरातील लोकशाहीला उतरती कळा लागली आहे, असे ‘डेमोक्रसी रिपोर्ट २०२५’ या अहवालात ‘व्ही-डेम’ या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या अहवालात दिसून आले आहे. आपण जगातील लोकशाहीचे पतन रोखू शकलो नाही, याविषयी चिंता या अहवालात व्यक्त करण्यात आली असून आपला प्रवास हा मागच्या पावलांनी सुरू आहे आणि आपण १९८५ या वर्षापर्यंत मागे ढकलले गेलो आहोत, असेही या अहवालात सखेद नमूद करण्यात आलेले आहे.
मागील काही वर्षांमध्ये घडामोडींमुळे जगामध्ये वीस वर्षानंतर पहिल्यांदाच उदारमतवादी लोकशाहीप्रधान देशांच्या संख्येपेक्षा एकाधिकारशाही असलेल्या देशांची संख्या वाढलेली आहे. उदारमतवादी लोकशाही प्रांजळपणे अनुसरणारा देशांची संख्या केवळ २९ असल्याचे या अहवालामध्ये दिसून आलेले आहे. एखाद्या देशात निवडणुका घेतल्या जातात म्हणजे तिथे लोकशाही नांदत असते, असे नाही. अशा देशांमध्ये लोकशाही असते पण ती केवळ निवडणुकीच्या माध्यमातून असते. केवळ औपचारिकपणे निवडणुका घेणारे देश आणि लोकशाही मूल्ये रुजलेले देश यांमध्ये भेद केला जातो. भारताने आपले ‘उदारमतवादी लोकशाही’ असलेल्या देशांच्या यादीतील स्थान गमावले असून, ‘निवडणुकीवर आधारित एकाधिकारशाही’ असलेल्या देशांच्या यादीत भारत आता मोडतो.