

Water Crisis in India
esakal
लेखक :- सुदर्शन कुडचे
पाणी हा जीवनाचा मूलभूत आधार आहे. मानव, शेती, उद्योग आणि पर्यावरण यांचे अस्तित्व पाण्यावर अवलंबून आहे. पृथ्वीच्या सुमारे सत्तर टक्के पृष्ठभागावर पाणी असले तरी त्यापैकी सुमारे सत्त्याण्णव टक्के पाणी खारे आहे. भारतात जगाच्या सुमारे सतरा टक्के लोकसंख्या राहते; परंतु जगातील गोड्या पाण्याच्या संसाधनांपैकी केवळ चार टक्के संसाधने भारताकडे आहेत. वाढती लोकसंख्या, शहरीकरण, औद्योगिकीकरण आणि हवामान बदल यांमुळे पाणीटंचाईचे संकट अधिक गंभीर होत आहे.
भारताला नद्या, तलाव, भूजल आणि मान्सून पर्जन्य यांसारखी समृद्ध जलसंपत्ती लाभली असली तरी देशातील अनेक भागांमध्ये पाणीटंचाईची समस्या कायम आहे. स्वातंत्र्याच्या काळात प्रतिव्यक्ती वार्षिक जलउपलब्धता पाच हजार घनमीटरपेक्षा जास्त होती; ती आता सुमारे दीड हजार घनमीटरपर्यंत खाली आली आहे. राजस्थान, मराठवाडा, विदर्भ आणि बुंदेलखंड यांसारख्या भागांना वारंवार दुष्काळाचा सामना करावा लागतो, तर काही प्रदेश पूरग्रस्त होतात.
भारत हा जगातील सर्वाधिक भूजल वापरणाऱ्या देशांपैकी एक आहे. शेती, पिण्याचे पाणी आणि उद्योग यासाठी मोठ्या प्रमाणावर भूजलाचा वापर केला जातो. पंजाब, हरियाणा, गुजरात, महाराष्ट्र आणि कर्नाटकातील अनेक भागांमध्ये भूजल पातळी सातत्याने घटत आहे. मराठवाड्यातील लातूर येथे काही वर्षांपूर्वी रेल्वेद्वारे पाणीपुरवठा करावा लागला होता, हे जलसंकटाचे गंभीर उदाहरण मानले जाते.