
शैलेश नागवेकर
shailesh.nagvekar@esakal.com
एकेकाळी वेस्ट इंडीज संघातील सर्व ११ खेळाडू प्रचंड ताकदवान असायचे. एका फलंदाजाला बाद केले किंवा एका गोलंदाजाला बदलले म्हणजे समोरच्या संघाची सुटका झाली, असे व्हायचेच नाही. कारण बॅटमधून होणारा प्रहार आणि गोलंदाजाच्या तोफखान्यातून सुटणाऱ्या चेंडूंची हुकूमत असायची. दहशत निर्माण करणारी खाणच होती... आता मात्र हा संघ कमकुवत झाला आहे...
फलंदाज नव्हे, ते होते दैत्य आणि गोलंदाज नव्हे तर होता तोफखाना... हा विचार क्रिकेट विश्वात कोणाच्याही मनात आला तरी लगेचच समोर दिसू लागायचा कधी काळी क्रिकेट विश्वावर अमर्याद वर्चस्व गाजवलेला वेस्ट इंडीजचा संघ! त्याकाळी दरारा या शब्दाचेही पाय लटपटतील, असा तो संघ होता. अशा वेस्ट इंडीज संघाविरुद्ध खेळायचे म्हणजे प्रतिस्पर्ध्यांची हार जवळपास निश्चित असायची. केवळ पराभवाचे अंतर कमी करता येईल, एवढाच काय तो प्रतिस्पर्ध्यांचा लढा असायचा. अर्थात अशा दैत्य संघाचा १९७१ मध्ये अजित वाडेकर यांच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने वेस्ट इंडीजमध्ये पराभव केला होता. लिटिल मास्टर सुनील गावसकर यांनी पदार्पणाच्या त्या दौऱ्यात हेल्मेट न घालता (तशीही त्यांनी हेल्मेट घालून कधीच फलंदाजी केली नाही) सर्वाधिक धावांचा पाऊस पाडला होता.