
देवमासा आणि माणूस यांच्यात काही आश्चर्यकारक साम्य आहे. हे दोघेही सजीव सृष्टीच्या उत्क्रांतीच्या साखळीत एकाच वर्गात मोडतात. दोघेही सस्तन प्राणी आहेत. आईचे दूध पाजणे, उबदार शरीर, फुप्फुसाने श्वास घेणे, केस असणे याबाबतीत त्यांच्यात साम्य आहे.
माणूस भाषेचा वापर करतो; तर काही देवमासे विशिष्ट आवाज, क्लिक्स आणि गाण्यांच्या साहाय्याने संवाद साधतात. जेव्हा माणूस देवमाशांच्या अवतीभवती नव्हता तेव्हा त्यांनी एकमेकांशी संपर्क करण्याची स्वतःची अशी एक यंत्रणा विकसित केली होती. एका विशिष्ट प्रकारच्या आवाजाने देवमासे एकमेकांशी संभाषण करू शकत होते. दोईन देवमासे असे आवाज काढून एकमेकांशी जगात कुठेही संपर्क करू शकतात. अगदी १,५०० ते २,००० किलोमीटर अंतरावरील देवमाशांशी ते संपर्क साधू शकायचे; पण माणसाचा समुद्रात वावर वाढला, आवाजाचे प्रदूषण व्हायला लागले आणि ही संपर्क यंत्रणा कोलमडायला लागली.