Pune Bitcoin case : नेमकं घडलं काय? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bitcoin }

Pune Bitcoin case: नेमकं घडलं काय?

बिटकॉइन' या आभासी चलनाच्या (क्रिप्टो करन्सी) फसवणुक प्रकरणाची सुरूवात दत्तवाडी पोलिस ठाणे, पुणे शहर पोलिस दलातील तसे जरा जास्तच व्यस्त असणारे पोलिस ठाणे. जनता वसाहत या शहरातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीचा परिसर याच पोलिस ठाण्याच्या हद्दित येत असल्याने गंभीर गुन्हे इथे दिवसागणिक चालत येतात. दरम्यान, 2018 हे वर्ष सुरु झाले आणि एक वेगळाच गुन्हा या पोलिस ठाण्यात दाखल करण्यासाठी काही व्यक्ती आल्या. आर्थिक फसवणुकीचाच हा प्रकार असला तरीही, हा गुन्हा मात्र काहीसा वेगळा होता, कारण यात फसवणूक झालेल्या लोकांची गुंतवणूक कुठल्याही कंपनी, बॅंक, पतसंस्था, खासगी बॅंक अशा कुठल्याच नावाने झाली नव्हती, तर हि फसवणूक होती, "आभासी चलना'ची म्हणजेच क्रिप्टोकरन्सीमधील एक असलेल्या "बिटकॉईन' (Bitcoin)ची. पोलिसांच्या दृष्टीनेही हा प्रकार नवीनच होता आणि नुकतेच बाळसे धरलेल्याल्या सायबर पोलिसांसाठीही हा प्रकार तितकाच नवीन होता.

बिटकॉईन, गेन बिटकॉईन'ने उघडले आभासी चलनाचे खाते
दत्तवाडी व निगडी पोलिस ठाण्यात 2018 मध्ये "बिटकॉईन'मध्ये गुंतवणूक करून जास्तीत जास्त बिटकॉईन किंवा जादा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून काही नागरिकांना लाखो रूपयांना गंडा घातल्याचे प्रकरण पुढे आले. त्यातूनच अमित भारद्वाज, विवेक भारद्वाज, त्यांचे कुटुंब व अन्य साथीदारांची नावे पुढे आली. भारद्वाज बंधुंनी 10 बिटकॉईनच्या मोबदल्यात 18 बिटकॉईन 18 महिन्यात परत करण्याचा करार गुंतवणुक करणाऱ्यांसमवेत केला होता. अशा गुंतवणुकीत घेतलेला पैसा, त्याचे हिशोब व तपास करण्यासाठीचे तज्ज्ञ अधिकारी, सायबर एक्‍सपर्ट पोलिस यंत्रणेकडे नसल्याचा फायदा भारद्वाज बंधुंनी घेतला होता.

तर दुसरीकडे हा "क्रिप्टोकरन्सी'चा प्रकार काय आहे, गुंतवणूक कशी करतात, त्यामध्ये फसवणूक कशी होऊ शकते, असे एक ना अनेक प्रश्न पोलिसांपुढेही आले, परंतु पोलिस त्यामध्ये तज्ञ नव्हते. त्यामुळे खास बिटकॉईनशी संबंधीत सायबर तज्ञांची मदत घेण्याशिवाय पोलिसांपुढे पर्याय नव्हता. पुण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर हे प्रकरण केवळ, पुणे, महाराष्ट्रापुरतेच मर्यादीत राहीले नाही. तर त्याचे फसवणुकीचा हा प्रकार संपुर्ण भारतभर असल्याचे पोलिसांच्या चौकशीमध्ये पुढे उघड झाले. पुढे नांदेड, कोल्हापुर, मुंबई, ठाणे, नागपुर, कोल्हापुर, येथे 12 गुन्ह्यांची नोद झाली, त्याचबरोबर पंजाब, हरियाणा, राजस्थान येथे 42 गुन्ह्यांची नोंद झाली. विशेषत: या फसवणूक प्रकरणाच्या जाळ्यात अडकलेल्यांमध्ये मोठे व्यावसायिक, डॉक्‍टर, वकील, उद्योजक, रिअल इस्टेट अशा सगळ्याच क्षेत्रातील लोकांचा पैसा अडकुन पडला होता, मात्र त्यावेळी तेव्हा पुढे येऊन आपण बिटकॉईनमध्ये गुंतवणुक केली, आपली फसवणूक झाली, याबाबत बोलण्यास तितके तयार नव्हते, त्यामुळे फसवणुक होऊनही केवळ गप्प बसण्याशिवाय आणि पोलिसांकडून होणाऱ्या तपासासंदर्भात माहिती घेण्याशिवाय त्यांच्या हाती काहीच नसल्याचे स्पष्ट झाले होते. या व्यक्तींमध्ये अनेक नामवंत व्यक्तींचीही नावे होते, मात्र हि नावे कधीच पुढे आली नाहीत.

अमित भारद्वाजच्या अटकेनंतर तत्कालीन पोलिस आयुक्त रश्‍मी शुक्‍ला यांची "ती' पत्रकार परिषद !
बिटकॉइन प्रकरणाचा तपास करणाऱ्या सायबर पोलिसांनी 2018 मध्ये दिल्ली येथे जाऊन दुबईला पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या मुख्य सुत्रधार अमित भारद्वाज, निकुंज जैन, साहिल बागल यांना अटक करुन पुण्यात आणले. त्यानंतर तत्कालीन पोलिस आयुक्त रश्‍मी शुक्‍ला यांनी तत्काळ पत्रकार परिषद घेतली. याच परिषदेत शुक्‍ला यांना आपण किती मोठा गुन्हा उघडकीस आणला. आपल्यावर हे प्रकरण दाबण्यासाठी दिल्लीतून किती दबाब आणला गेला, हे सांगताना अश्रू अनावर झाले होते. पुढे या प्रकरणातील मुख्य एजंट हेमंत भोपे, संकेत मोरे, हेमंत सुर्यवंशी, हेमंत शेवाळे, हेमंत चव्हाण, आकाश संचेती यांना अटक झाली. त्यांच्याकडून 160 ते 180 बिटकॉईनही पुणे पोलिसांनी जप्त केले. मात्र पुढे या प्रकरणातील मुख्य सुत्रधार अमित भारद्वाज याच्यासह अन्य व्यक्तींना जामीन मिळाला. पुढे अमित भारद्वाज याचा मृत्युही झाला. मात्र या प्रकरणातील त्याचा भाऊ विवेक भारद्वाज यास आजही अटक झालेली नसल्याची सद्यस्थिती आहे.

पंकज घोडे व रविंद्र पाटील यांची 'एंट्री'
शुक्‍ला यांच्या पतीवर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यावेळी तेथील एका कर्मचाऱ्याच्या माध्यमातुन पंकज घोडे याची शुक्‍ला यांच्याशी ओळख झाली, त्यानेच पुढे केपीएमजीचा संचालक रविंद्र पाटील याच्याशीही ओळख करुन दिली. दोघेही सायबर तज्ञ. बिटकॉईनबाबत चांगली माहिती आणि अभ्यास असल्याने शुक्‍ला यांनी दोघांचेही या प्रकरणात मार्गदर्शन घेतले, इतकेच नव्हे तर तेच दोघे पोलिसांना, पत्रकारांनाही शुक्‍ला यांच्या उपस्थितीच मार्गदर्शनही करु लागले. त्यातून भारद्वाज बंधुंच्या बिटकॉईन फसवणुकीतुन कमाविलेल्या पैशांचे मोठे साम्राज्य पुढे आले. दरम्यान, बिटकॉईन प्रकरणाचा तपास व कारवाई सुरु होती. त्याचवेळी अमित भारद्वाज, निकुंज जैन व साहिल बागल या तिघांच्या पोलिस कोठडीत असताना अनेक त्रुटी तसेच आरोपींच्या वॉलेटमधून आपोआप बिटकॉईनल गायब झाल्याचा प्रकार घडत होता. या संपुर्ण प्रकरणामध्ये गैरप्रकार होत असल्याचे निदर्शनास आल्याने तक्रारादारांनी आर्थिक गुन्हे शाखेच्या मुख्य कार्यालयास पत्र पाठवून कळविली. त्याचवेळी अतिवरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी केली. पुढे याच दोघांनी थेट पोलिसांनाच कात्रजचा घाट दाखवित दगाफटका केल्याचे उघड झाले. घोडे व पाटील या दोघांनी पोलिसांनी मोठ्या विश्‍वासाने दिलेले आरोपींचे मोबाईल, लॅपटॉप, ईमेल, पासवर्ड, सर्व गॅझेटस्‌, युजर आयडी, त्यांचे पासवर्ड गुप्त पद्धतीने हाताळून योग्य अहवाल पोलिसांना सादर करणे अपेक्षित होते.

पुणे सायबर पोलिसांची बिटकॉईनप्रकरणी कामगिरी उल्लेखनीय पण...!
या प्रकरणात पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कसुन तपास केला. नव्यानेच घडलेला हा प्रकार पोलिसांनी अतिशय हुशारीने हाताळला. 206 बिटकॉईन जप्त करीत 38 लाख रूपयांची रक्कमही जप्त केली, त्यामध्ये मुख्य सूत्रधारासह 27 हुन अधिक आरोपीना अटक करुन दोषारोप पत्रही दाखल केले. सायबर पोलिसांनी या प्रकरणाचा इतका चांगला तपास केला असला तरीही आरोपींना तत्काळ मिळालेला जामीन, तपासामध्ये राहिलेल्या त्रुटी व बिटकॉईन पळविण्याच्या प्रकारामुळे पोलिसांची कामगिरी मात्र झाकोळली गेली. दरम्यान, या प्रकरणाचा तपास जाणीवपुर्वक वरचेवर करुन "बिटकॉईन फाईल्स' बंद करण्याचा दोन ते तीन वेळा प्रयत्न झाल्याचा आरोप तक्रारदारांनी केला होता. मात्र 2021 मध्ये भारतीय पोलिस सेवेतील महिला पोलिस अधिकाऱ्याने या प्रकरणाची सखोल चौकशी केली. तेव्हा, पोलिसांना मदत करणाऱ्या सायबर तज्ज्ञांनीच पोलिसांना गंडा घातल्याचे उघड झाले. संबंधित सायबर तज्ज्ञांनी 2018 मध्ये मोठ्या चलाखीने चोरलेल्या बिटकॉईनचे प्रकरण 2022 मध्ये उघड झाले. सायबर पोलिसांना "ब्लॉकचेन टेक्‍नॉलॉजी'चे प्रशिक्षण वेळीच मिळाले असते, तर कदाचित हा गुन्हा दाखल होण्यासाठी 2022 हे वर्ष उजाडण्याची गरजच पडली नसती.

भारद्वाज बंधुच्या "बुर्ज खलीफा"लाही लाजवणारे कुबेरी वैभव !
बिटकॉईनमध्ये गुंतवणुक करणाऱ्यांच्या पैशातुनच मुख्य सूत्रधार अमित भारद्वाज आणि त्याच्या कुटुंबीयांनी देश-परदेशात फ्लॅट, ऑफिस, जागा विकत घेतल्या. या मालमत्तामध्ये अमेरिका, हॉंगकॉंग, दुबईमध्ये कंपन्या स्थापन करुन त्यामध्ये पैसे वर्ग केले. तसेच दुबईतील "बुर्ज खलिफा"मध्ये सव्वा पाच कोटी रूपयांचा फ्लैट, "जुमेरा लेक टॉवर्स"च्या 31 व्या मजलयावर 15 कोटी रुपयांचे दहा हजार चौरस फुटाची 7 कार्यालये घेतली. याबरोबरच दुबईमध्येच "मरीन प्रिन्सेस टॉवर्स"च्या 8 व्या मजल्यावर सव्वा दोन कोटी रुपयांचा सातशे चौरस फुटाचा फ्लैट, तमानी टॉवरमध्ये साडे तीन कोटी रुपयांचे चार कार्यालये खरेदी केले. इतकेच नाही, तर भारद्वाज बंधुंनी सिंगापुर, लंडन, अमेरीका, दक्षिण आफ्रीका, हॉंगकॉंग अशा विविध देशात 28 पेक्षा जास्त कंपन्या उघडून "मनी लॉंड्रींग' केल्याचा आरोप गुंतवणुकदारांकडून केला जातो. दुबईमध्ये त्याच्या 30 पेक्षा जास्त मालमत्ता आहेत.

वादग्रस्त पोलिस अधिकारी शुक्‍ला व "बिटकॉईन फाइल्स : 2.0'
पुणे पोलिस आयुक्त पदावरुन रश्‍मी शुक्‍ला यांची मुंबईत बदली झाली. दरम्यान, त्याचवेळी झालेल्या निवडणुकीनंतर शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस पक्षाच्या "महाविकास आघाडी"चे सरकार राज्यात स्थापन झाले. त्यानंतर वेगवेगळ्या कारणांमुळे शुक्‍ला यांचे नाव कायम चर्चेत राहिले. विशेषत: शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसच्या मोठ्या नेत्यांचे फोन टॅपिंग प्रकरण शुक्‍ला यांच्याच नेतृत्वाखाली झाल्याचे उघड झाले. त्यानंतर राज्य सरकारच्या आदेशानंतर शुक्‍ला यांच्या विरुद्ध बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला. या प्रकरणाची पुणे पोलिसांकडून एकीकडे चौकशी सुरु आहे. त्यामध्ये शुक्‍ला यांना जामीन मिळालेला असला तरीही शुक्‍ला यांचा जबाब नोंदविणार असल्याचे पुणे पोलिसांनी यापुर्वीच स्पष्ट केले आहे.

त्यातच शुक्‍ला यांच्या आयुक्तपदाच्या कार्यकाळातच घडलेले व आत्तापर्यंत धुळखात पडलेली "बिटकॉईन फाईल्स' पुन्हा उघडली. एवढेच नव्हे, तर शुक्‍ला यांनी सायबर तज्ज्ञ म्हणून पुढे आणलेल्या व त्यांनीच आरोपी, तक्रारदारांच्या असंख्य बिटकॉईनचा अपहार करणाऱ्या पंकज घोडे व रविंद्र पाटील यांनाही पोलिसांनी अटक करुन आपल्या तपासाची "दिशा' स्पष्ट केली आहे. पोलिस तपासामध्ये घोडे व पाटील यांच्याकडून अजुनही शुक्‍ला यांच्या नावाचा उल्लेख पुढे आलेला नाही. मात्र भविष्यातही तो येणारच नाही, असेही नाही. त्यामुळे एकीकडे शुक्‍ला यांना फोन टॅपिंग प्रकरणातुन जामीन मिळण्याचा तात्पुरता दिलासा मिळाला, तरीही "बिटकाईन फाईल्स ः 2.0' प्रकरण मात्र त्यांना चांगलेच भोवण्याची दाट शक्‍यता नाकारता येत नाही आहे.

राजकीय दबावतंत्र की खरोखरच होणार शुक्‍ला यांच्यावर कारवाई
फोन टॅपिंग प्रकरणात शुक्‍ला यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे असले तरीही या गुन्ह्याचा निशाणा शुक्‍ला यांचे निकटवर्तीय असलेल्या आणि भाजपच्या एका अतिवरिष्ठ नेत्यावर असल्याचे आता लपुन राहिलेले नाही. महाविकास आघाडीवरील "ईडी'च्या माध्यमातून होणाऱ्या हल्ल्याने पुरते घायाळ झाल्याने हे घाव भविष्यात कमी करण्यासाठी दबावतंत्र म्हणुन महाविकास आघाडीकडून शुक्‍ला यांच्यावरील "बिटकॉईन फाईल्स : 2.0' ची कारवाई पुढे येत असल्याचे वास्तव आहे. तर दुसरीकडे बिटकॉईन प्रकरणात पुणे पोलिसांनी पंकज घोडे व रविंद्र पाटील यांना अटक करुन आपला मार्ग निश्‍चित केला आहे. शुक्‍ला यांच्यामुळेच "बिटकॉइन' प्रकरणात मोठ्या दिमाखात "एंट्री' झालेले घोडे व पाटील हे त्यांचे पत्ते कधीही खुले करु शकतील. त्यामुळे "बिटकॉईन फाईल्स : 2.0' शुक्‍ला यांच्यासाठी निश्‍चितच धोकादायक ठरू शकण्याची शक्‍यता आहे.

मोठे पोलिस व प्रशासकिय अधिकारी गळाला लागण्याची शक्‍यता
दरम्यान, शुक्‍ला यांच्यासाठीच खास "बिटकॉईन फाईल्स' ः 2.0' प्रकरण खुले झाले असल्याची चर्चा आजही कायम आहे. असे असले तरीही घोडे, पाटील यांचे "करविते धनी" कोण आहेत, त्यांनी विश्वासघाताने चोरलेले बिटकॉइन कोणाकोणाच्या ई-वॉलेटमध्ये वर्ग केले आहेत ? त्यांचे लाभार्थी कोण आहेत ? कोणते "आयपीएस' अधिकारी या प्रकरणात सहभागी आहेत, असे अनेक प्रश्न आणि त्यांची उत्तरे "बिटकॉईन फाईल्स ः 2.0' मध्ये दडलेली आहेत. हे प्रकरण आता कुठल्या वळणावर पोचणार आहे, याची उत्तरे येणारा काळच देणार आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा.”