
डॉ. श्याम अष्टेकर
सार्वजनिक रुग्णालयांबरोबर धर्मादाय रुग्णालयक्षेत्र हे शासन, डॉक्टर आणि जनता या सर्वांसाठी मोलाचे आहे. रुग्णालयव्यवस्थेत धोरणात्मक आणि प्रशासकीय सुधारणा करण्यासाठी, संबंधित घटकांमध्ये पुरेशी चर्चा करून तपशील ठरवावा.
पुण्यातल्या एका घटनेनंतर धर्मादाय रुग्णालयांची कर्तव्ये, जबाबदाऱ्या यांची सार्वजनिक चर्चा होणे स्वागतार्ह आहे. धर्मादाय-आयुक्त यांच्या ४१-सी अधिनियमननुसार या रुग्णालयांनी दहा टक्के खाटा निर्धन आणि दहा टक्के आर्थिक दुर्बल रुग्णांसाठी राखीव ठेवायच्या आहेत आणि एकूण उत्पन्नाच्या दोन टक्के रक्कम यासाठी खर्च करायची आहे. हे पाहण्यासाठी जिल्हा आणि राज्यस्तरावर देखरेख समित्या आहेत. काही संस्था पाटीवर ‘धर्मादाय’ असा अस्पष्ट उल्लेख दाखवतात, आणि यापैकी कित्येक श्रीमंतांची रुग्णालये म्हणून ओळखली जातात.