
एकत्रित निवडणुकांची चर्चा आपल्याकडे सुरू झाली आहे. त्याबाबतचे विधेयक आता संयुक्त संसदीय समितीकडे पाठविण्यात आले आहे. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील समितीने एकत्रित निवडणुकांची शिफारस करताना दक्षिण आफ्रिका, स्वीडन, बेल्जियम, जर्मनी, इंडोनेशिया, फिलिपिन्स या देशांची उदाहरणे दिली आहे. एकत्रित निवडणुका होणाऱ्या देशांचा अभ्यास करून सर्वोत्तम पद्धत पद्धतीचा उपयोग आपल्याकडे कसा करता येईल याचाही विचार केला गेला. त्यातील काही पद्धतींची थोडक्यात माहिती
दक्षिण आफ्रिकाः
दक्षिण आफ्रिकेतील पहिल्या कृष्णवर्णीय सरकारच्या स्थापनेला यंदा ३० वर्षे पूर्ण झाली. वर्णद्वेषी राजवटीविरुद्ध लढा देणाऱ्या आफ्रिकन नॅशनल काँग्रेसला (एएनसी) उतरती कळा लागल्याचे यंदाच्या निवडणुकीतून स्पष्ट झाले. यावेळी त्यांना ४०० पैकी केवळ १५९ जागा मिळाल्या. त्यामुळे आघाडी सरकार अटळ होते. नेल्सन मंडेला यांच्या नेतृत्वाखाली १९९४ मध्ये झालेल्या आफ्रिकन नॅशनल काँग्रेसला पहिल्या निवडणुकीत ६२.६५ टक्के मते मिळाली होती.