
बंगळूरला झालेला २०१०मधील भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी सामना एका खेळाडूसाठी खास होता. प्रथम श्रेणीच्या १४ सामन्यांत ७२च्या सरासरीने १६७५ धावा काढल्याने निवड समितीने त्या फलंदाजाला भारतीय संघात निवडले. तो भारतीय संघ असा होता, ज्यात विरेंदर सेहवाग, राहुल द्रविड, सचिन तेंडुलकरसारखे दर्जेदार खेळाडू खेळत होते. पदार्पणाच्या पहिल्या खेळीत त्या फलंदाजाला फक्त चार धावा जमा करता आल्या; पण दुसऱ्या डावात त्याला अचानक तिसऱ्या क्रमांकावर बढती दिली गेली आणि त्याने ७२ धावा काढताना भारतीय संघाच्या कसोटी विजयात चांगले योगदान दिले.
त्यानंतर टप्प्याटप्प्याने विरेंदर सेहवाग, राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर क्रिकेटमधून निवृत्त झाले; पण त्या खेळाडूने अंगावर आलेली जबाबदारी समर्थपणे पेलत १०० कसोटी सामन्यात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले. १९ शतके, सात हजारपेक्षा जास्त धावा काढून त्या फलंदाजाने नंतरच्या काळात भारतीय संघाच्या कसोटी विजयात सिंहाचा वाटा उचलला. १०३ कसोटी सामन्यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीनंतर त्याने क्रिकेटला रामराम ठोकला आहे. होय मी चेतेश्वर पुजाराबद्दल बोलतो आहे. ज्याने त्याला लाभलेल्या माफक गुणवत्तेला संयम आणि कष्टाची जोड देत कमाल कामगिरी करून दाखवली.