
अमेरिकेतील वाचनप्रेमी डॅन पेल्झर यांनी आपल्या आयुष्यात पाच हजारांहून अधिक पुस्तकं वाचून काढली. पुस्तकं त्यांच्या आत्म्याचा भाग होती. त्यांच्या जीवनावरून एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे, वाचन हे आपलं कुटुंब, समाज आणि आत्म्याशी नातं घट्ट करतं. एक आनंदी वाचक म्हणून ९२ वर्षं सुखी-समाधानी आयुष्य जगलेले डॅन यांचं आयुष्य आपल्याला हाच संदेश देऊन जातं.
अरबी भाषेत एक जुनी म्हण आहे, ‘पुस्तक ही खिशात ठेवलेली एक बाग आहे’... अमेरिकेतील डॅन पेल्झर नावाच्या व्यक्तीचं संपूर्ण जीवन ही म्हण सांगून जाते. डॅन यांनी बागरूपी असलेल्या पुस्तकांमध्ये आपलं जीवन निव्वळ व्यतीत केलं नाही; तर वाचनाप्रती असलेल्या प्रेमामुळे ही बाग अधिक समृद्ध केली. अमेरिकेतील ओहियो शहरात राहणाऱ्या डॅन यांनी आपल्या ९२ वर्षांच्या आयुष्यात तब्बल पाच हजारांहून अधिक पुस्तकं वाचली. ही पुस्तकं त्यांच्या आत्म्याचा भाग होती आणि वाचन ही सवय नव्हे; तर त्यांचं जीवन होतं. पुस्तकं वाचून ते थांबले नाहीत... वाचलेल्या प्रत्येक पुस्तकाची रीतसर नोंद, टिपणं त्यांनी तयार करून ठेवली. डॅन यांचा नुकताच मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलांनी ही यादी पुढच्या पिढीकडे सोपवली. सोशल मीडिया, एआय आणि डिजिटलच्या आजच्या युगात डॅन यांचं वाचनप्रेम औत्सुक्याचा विषय ठरला असून त्यांचा हा प्रेरणादायी प्रवास जगभरातील लाखो वाचकांना भारावून टाकणारा आहे.