
युद्ध हा मानवी संस्कृतीला मिळालेला एक शाप आहे! महाभारत या आर्षकाव्यात वर्णिलेले युद्ध कौरव आणि पांडव या दोन सख्ख्या चुलत भावांमध्ये झालेले... ‘सुईच्या अग्रावर मावेल इतकी भूमीही तुला देणार नाही,’ असे दुर्योधनाने सांगितल्यावर पांडवांकडे युद्धसिद्ध होण्याशिवाय पर्याय राहिला नाही. कुरूक्षेत्रावर चाललेल्या महासंहारक युद्धात गांधारीने तिची शंभर मुले गमावली. कौरव असले तरी त्या आईसाठी तिची ती प्रिय मुलेच होती... पांडवांनीही त्यांच्याकडील अनेक शूरवीर रणांगणावर गमावले. कोवळ्या अभिमन्यूच्या छिन्नविच्छिन्न देहावर विलाप करणाऱ्या आईचा आक्रोश त्यांनाही ऐकला. अनादी काळापासून स्त्रिया रडत आहेत; पुरूष युद्ध करत आहेत.
जशी माणसाने वैज्ञानिक प्रगती केली, तशी त्याने जगाचा विद्ध्वंस करणारी अनेक संहारक अस्त्रे शोधून काढली. अण्वस्त्रे, फायटर जेट्स, पाणबुड्या, मशीनगन्स, रासायनिक शस्त्रे... आकाश, जमीन आणि पाणी या तिन्ही लोकी माणसाने कब्जा केला. तंत्रज्ञानातील शोधांचा वापर करून लाखो-करोडो किंमतीची शस्त्रनिर्मिती होत आहे. ही शस्त्रनिर्मिती जगातील प्रगत देश करत आहेत आणि युद्धे मात्र प्रामुख्याने जगातील अप्रगत देशांच्या भूमीवर होत आहेत. ‘माझ्या घरातील चाकू स्वस्तात विकत घे आणि रस्त्यावरच्या गुंडाला मारून टाक,’ असे हे सांगणे आहे! काही देश युद्ध करत आहेत, तर काही देश त्या युद्धात स्वतःचा व्यापार वाढवत आहेत. मात्र कधीही, कुठेही चालणाऱ्या युद्धात स्त्रियांचे मात्र नुकसानच होत आहे.