
निर्मला सामंत प्रभावळकर, राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष
महिला अत्याचाराबाबत दिल्लीतील परिस्थिती वाईट तर आहे, पण आपल्याकडे मुंबई, पुण्यासह राज्यात हे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. धक्कादायक बाब म्हणजे महिलांचे अपहरण करून, त्यांना जबरदस्तीने घेऊन जाण्याचे प्रमाण दिल्लीपाठोपाठ मुंबईत जास्त आहे. पोक्सो म्हणजेच लैंगिक अत्याचारांपासून लहान मुलांचे संरक्षण करणाऱ्या कायद्याखाली नोंदवण्यात येणाऱ्या गुन्ह्यांचे प्रमाणही राज्यातील मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर तसेच इतर शहरांमध्ये वाढलेले दिसत आहे.
महाराष्ट्रातील महिलांविषयीच्या अपराधाच्या गुन्ह्यांपैकी ९४ टक्के खटले प्रलंबित असल्याचे अनेक अहवालांत नमूद केले आहे. महिलांकडे बघण्याचा सामाजिक दृष्टिकोन अजूनही चुकीचा आहे. समाजावरील पुरुषप्रधान संस्कृतीचा पगडा अजूनही गेलेला दिसत नाही. हा पगडा दूर करण्याचे प्रयत्न जाणीवपूर्वक व्हायला हवेत.